धुळे : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पळासनेर परिसरात एका सराईत मोटारसायकल चोरट्याला दहा मोटारसायकलींसह अटक केली आहे. पोलिसांनी गमदास उर्फ गमा देवराम भिल या सराईत चोरट्याला बेड्या ठोकत त्याच्याकडून 3 लाख 25 हजार रुपये किंमतीच्या चोरीच्या दहा मोटारसायकली जप्त केल्या आहेत. शिरपूर तालुक्यातील हाडाखेड येथून दीपक नंदू वंजारी यांची चोरी गेलेली हिरो कंपनीची मोटारसायकल आणि इतर गुन्ह्यांचा तपास करत असताना धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुप्त माहितीच्या आधारे पळासनेर परिसरातून गमदासला ताब्यात घेतले आणि कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाने ही कारवाई केली आहे.