एक लाख रुपयांची लाच घेतांना सहायक सरकारी वकीलास अटक

0
13105
बुलढाणा- जिल्ह्यातील मेहकर येथील एका वकिलाला एसीबीच्या अधिकाऱ्यांनी न्यायदानाच्या प्रक्रियेत आपली भूमिका योग्यरीतीने पार पाडण्या साठी थोडी थोडकी नव्हे तर चक्क एक लाख रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आल्याने वकिल वर्गाची चांगलीच “अब्रु घालवण्यात” आली आहे.
डोणगाव पोलीस ठाण्यात दाखल एका गुन्ह्यात आरोपीला शिक्षा होईल,अशा पद्धतीने न्यायालयात युक्तिवाद करण्यासाठी एक लाख रुपयाची लाच स्वीकारणाऱ्या सहायक सरकारी वकील  जनार्धन मनोहर बोदडे,वय ६१ वर्षे, यांस वाशिम एसीबीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवार दिनांक २८ फेब्रुवारी रोजी दुपारी लाचेची रक्कम घेत असताना रंगेहाथ अटक केली आणि त्यामुळे मेहकर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी मेहकर येथील एका ५० वर्षीय तक्रारकर्त्याने वाशिम लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार, मेहकर तालुक्यातील डोणगाव पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातील आरोपीला न्यायालयात शिक्षा होईल,अशा प्रकारे बाजू मांडण्यासाठी मेहकर न्यायालयातील सहायक सरकारी वकील जनार्धन मनोहर बोदडे यांने तीन लाख रुपयांची लाच मागितली होती.
    लाचेची रक्कम द्यायची मनापासून इच्छा नसल्याने तक्रारकर्त्याने दिनांक २४ फेब्रुवारी रोजी वाशिम लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीच्या  पडताळणी दरम्यान बोदडेने पंचासमक्ष २ लाख ५० हजार रुपये मागितले होते. तक्रारीची सत्यता पटल्यामुळे वाशिम एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला आणि त्यात पंचासमक्ष एक लाख रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना मेहकर न्यायालय परिसरात सहायक सरकारी वकील जनार्धन मनोहर बोदडे पुरते अडकले.वाशिम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वकील बोदडेला ताब्यात घेतले असून लाचखोरीच्या याप्रकरणी मेहकर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    ही कारवाई वाशिम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक बालाजी तीप्पलवाड, पोलीस हवालदार विनोद मार्कंडे, आसिफ शेख, योगेश खोटे, शिपाई रवींद्र घरत आणि मिलिंद चन्नकेशला व त्यांच्या पथकातील  सदस्यानी केली.