३० हजाराची लाच घेणारा वडनेर भुजंगचा ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात

0
1175
अमरावती,दि.१८ः जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील वडनेर भुजंग येथील ग्रामपंचायत कराची थकबाकी माफ करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामसेवक अर्जुन पवारला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,अमरावती पथकाने रंगेहाथ अटक केली.ही कारवाई मंगळवारी (१७ जून) अचलपूर शहरातील मोती मंगल कार्यालयाजवळ सायंकाळी करण्यात आली.
तक्रारदार हे वडनेर भुजंग येथील सर्वज्ञ मंगलम या मंगल कार्यालयाचे व्यवस्थापक असून संबंधित मालमत्तेवरील २०२० ते २०२५ या कालावधीतील ग्रामपंचायत कर थकीत होते.कर भरण्यासाठी त्यांनी अर्ज सादर केला होता. या प्रकरणात ग्रामसेवक अर्जुन पवार यांनी तक्रारदारास प्रत्यक्ष भेटून,मागील दोन वर्षांचा कर भरल्यास उर्वरित चार वर्षांचा सुमारे ८० हजार रुपयांचा थकीत कर माफ करून देतो,मात्र त्यासाठी ३० हजार रुपये द्यावे लागतील,अशी लाचेची मागणी केली.तक्रारदाराने ही बाब १६ जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावतीकडे लेखी स्वरूपात कळवली. त्यानंतर १७ जून रोजी सकाळी पडताळणी करण्यात आली.संध्याकाळी सापळा कारवाई दरम्यान,आरोपी अर्जुन पवार यांनी पंचासमक्ष तक्रारदाराकडून ३० हजार रुपये स्विकारताच रंगेहाथ अटक करण्यात आली.या प्रकरणी अचलपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.