अंतिम सत्र/ वर्षाच्या बॅकलॉगच्या परीक्षांना सुरुवात

0
70

मुंबई,दि.२५ सप्टेंबर: मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०१९-२० च्या अंतिम वर्ष / सत्राच्या बॅकलॉगच्या परीक्षा आजपासून सुरु झाल्या. मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित महाविद्यालये, विद्यापीठ शैक्षणिक विभाग आणि दूर व मुक्त अध्ययन संस्थेतील विद्यार्थी या परीक्षांना प्रविष्ठ झाले होते. चारही विद्याशाखेअंतर्गत विविध अभ्यासक्रम आणि विषयांच्या बॅकलॉगच्या परीक्षा आज सुरळीत पार पडल्या. अत्यंत सुलभ अशा सॉफ्टवेअरच्या माध्यमातून  विद्यापीठाने आणि महाविद्यालयांनी ऑनलाईन बहुपर्यायी प्रश्नांच्या स्वरुपात परीक्षा घेतल्या. परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना नमूना प्रश्न पत्र व त्यांच्या सराव परीक्षाही घेण्यात आल्या होत्या. काही विषयांच्या सराव परीक्षा अजूनही घेतल्या जाणार आहेत. काही अपरिहार्य किंवा तांत्रिक कारणास्तव एखादा विद्यार्थी परीक्षेला बसू शकला नसेल अशा विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पुन्हा संधी दिली जाणार असल्याचे परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.

बॅकलॉग आणि नियमित परीक्षांच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठाने विद्याशाखानिहाय महाविद्यालयांचे ९४ समुह निर्माण केले आहेत. समुह महाविद्यालयांनी त्यांच्या वेळापत्रकानुसार आजच्या बॅकलॉगच्या परीक्षांचे यशस्वी आयोजन करण्यात आल्याचेही डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.