35.5 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home शैक्षणिक नागपूर विद्यापीठाचा परिक्षेच्या पहिल्याच दिवशी ऑनलाईन सावळा गोंधळ

नागपूर विद्यापीठाचा परिक्षेच्या पहिल्याच दिवशी ऑनलाईन सावळा गोंधळ

0
98

blank

भंडारा- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ऑनलाईन परिक्षेच्या पहिल्याच दिवशी पुन्हा ‘फ्लॉप शो’ झाला आहे. 25 मार्च रोजी विविध शाखांच्या ऑनलाईन परिक्षेचा पहिला पेपर होता. मात्र नागपूर विद्यापीठाच्या अ‍ॅपवर लॉगीन करताना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागला. परिक्षेच्या वेळेनंतरही जवळपास 2 तास अ‍ॅपमध्ये विद्यार्थ्यांचे लॉगीन होत नव्हते. नियोजनपुर्ण परिक्षा घेण्यास नागपूर विद्यापीठ अपयशी ठरल्याने ऐन परीक्षेच्या वेळी गोंधळ उडाला. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. आज झालेला प्रकार हा मागील वर्षीच्या उन्हाळी परिक्षा 2020 ची पुनरावृत्तीच असल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात येते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बीबीए, बीकॉम, इंजिनीअरिंग अशा विविध शाखांच्या परिक्षा 25 मार्चपासून ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येत आहे. सकाळी 8 वाजता पासून ऑनलाईन परिक्षेला सुरूवात झाली. मात्र पहिल्याच टप्प्यात ही ऑनलाईन यंत्रणा निकामी ठरली. पहिल्याच दिवशी लिंक फेल, सर्व्हर, एरर आदी समस्या पोर्टलवर दिसून येत होत्या. विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या अ‍ॅपमध्ये वारंवार लॉगीन करावे लागत आहे. विद्यार्थ्यांनी परिक्षेकरिता लॉगीन केल्यावर एक-दोन प्रश्न सोडवून होत नाही तोच एरर येत असल्याने विद्यार्थ्यांना वारंवार लॉगीन करावे लागत होते. तर पुन्हा लॉगीन केल्यावर ‘यूवर एक्झाम टाइम इज ओव्हर’ असा संदेश येत होता. तर काही विद्यार्थ्यांचे लॉगीनच झाले नाही, काहींचे पेपर आला नाही तर काही विद्यार्थ्यांचे पेपरच सबमिट झाले नाही. अशा एक ना अनेक समस्यांना विद्यार्थ्यांना सामोरा जावे लागले. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर दिलेले हेल्प लाईन नंबर सुद्धा ‘नॉट रिचेबल’ होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तक्रार करावी कोणाकडे असा प्रश्न निर्माण झाला.

मागील वर्षीच्या परिक्षेच्या प्रसंगीही अशाच प्रकार घडला होता. यानंतरही विद्यापीठाने कुठलीही सुधारणा केली नसल्याने पुन्हा तसाच प्रकार घडून विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. तर त्या विद्यार्थ्यांचे पेपर सबमिट झालेच नाही, त्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाल्याने विद्यार्थी व पालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.नागपूर विद्यापीठाच्या ऑनलाईन परिक्षा आणि गोंधळ असा नवीन समीकरणच तयार झालेला आहे. मॉक टेस्टचा अभाव, अपात्रताधारक पुरवठा, हेल्प लाईन केंद्राची अकार्यक्षमता, कनेक्टीव्हीटीचा अभाव आणि विद्यापीठातील अधिकाèयांचा दुर्लक्षामुळे नागपूर विद्यापीठाकडून व्यवस्थित नियोजन न केल्याचे दिसून येत आहे.

नागपूर विद्यापीठाच्या नियोजन शून्य कारभारामुळे परिक्षेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना प्रचंड मानसिक त्रासाला समोरे जावे लागले. भंडारा जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी सकाळपासून परिक्षा देण्यासाठी तारेवरची कसरत करीत होते. काही ठिकाणी नेटवर्क प्रोब्लेम असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी शेतावर व टेकडीवर जावून बसलेले दिसले. मात्र तेथेही लॉगीन करण्यास समस्या येत असल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर दिलेल्या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क केल्यास ‘आम्हाला वारंवार फोन करून त्रास देवू नका’ असे उलट उत्तर देण्यात येत असल्याची तक्रारही विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.

नागपूर विद्यापीठातर्फे परिक्षेकरिता विद्यार्थ्यांकडून भरमसाठ शुल्क वसूल केली जाते. असे असतानाही ऐन परिक्षेच्यावेळी विद्यार्थ्यांना जर अशा समस्यांना समोर जावे लागत असेल तर विद्यार्थ्यांचे आर्थिक आणि शैक्षणिक नुकसान कोण भरून देणार? असा प्रश्न  विद्यार्थी कल्पेश चामट,पकंज पडोळे,सचिन करंडे,अजय आजबले,अभय साठवणे,पल्लवी शिरसागर,निकिता बाहे,निशा कुशवाह,वैष्णवी झाडे,नुतन खरवाडे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत उपस्थित केला.

blank