परीक्षा विभागात तंत्रज्ञानाचा वापर करणार- कुलगुरू डॉ.सुहास पेडणेकर

0
12

मुंबई – परीक्षा विभागात अनेक विद्यार्थी विविध समस्या व प्रश्न घेऊन येतात, त्यांचे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी  तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल असा विश्वास  मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी केला, ते परीक्षा विभागात आयोजित केलेल्या विद्यार्थी संवाद सत्रात बोलत होते. आजच्या विद्यार्थी संवाद सत्रात आठ महाविद्यालयातील व विद्यापीठाच्या  विभागातील विद्यार्थ्यांनी  कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्याशी संवाद साधून परीक्षा विभागाशी संबंधित असलेल्या आपल्या समस्या मांडल्या. कुलगुरूंनी त्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. परीक्षा विभागाचा विद्यार्थी संवाद उपक्रम दर मंगळवारी होणार आहे.

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या संदर्भात विद्यार्थ्यांच्या समस्या, प्रश्न जाणून घेण्यासाठी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी दर मंगळवारी सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० या वेळेत विद्यार्थ्यांशी भेटून संवाद साधण्याचा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाच्या आजच्या पहिल्या दिवशी आठ महाविद्यालयातील व विद्यापीठाच्या  विभागातील विद्यार्थ्यांनी  कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्यासमोर आपल्या समस्या मांडल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील योगिता पेडणेकर या बीएफए या अभ्यासक्रमाची  विदयार्थीनीं आजारी असल्याने  प्रोजेक्ट वेळेवर सादर न केल्यामुळे तिला तोंडी परीक्षा देता आली नाही. विद्यापीठातील गणित विभागातील ७ विद्यार्थ्यांनी  सत्र ४ ची परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली. वांगणी येथील हर्णे  अभियांत्रिकी महाविद्यालयातील एक विद्यार्थी पदवी प्रमाणपत्र लवकर मिळावे म्हणून विनंती केली. साठ्ये महाविद्यालयातील मिलिंद तोरसेकर याचा एमएस्सीचा राखीव निकाल लवकर जाहीर झाला नाही याबद्दल त्याने तक्रार केली. तर आसनगाव येथील शिवाजीराव जोंधळे अभियांत्रिकी महाविद्यालयातील ५ विद्यार्थी त्याच्या परीक्षेच्या वेळेत बदल करावा तसेच वेळापत्रकामध्ये एक दिवसाचे अंतर ठेवावे अशी सूचना केली. एलएलएमच्या  एका विद्यार्थिनीने लॉची परीक्षा ऑनलाईन घेण्याची विनंती कुलगुरूंना केली.

अशा आठ केसेस आज कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्यासमोर आल्या. या विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकून त्या लवकरात लवकर सोडविण्याचे निर्देश  कुलगुरूंनी परीक्षा विभागाचे संचालक डॉ. विनोद पाटील व उपस्थित असलेले सर्व सहाय्यक कुलसचिव व उपकुलसचिव यांना दिले. तसेच परीक्षा विभागातील  अनेक जुन्या प्रथा बदलण्यात येतील, तंत्रज्ञानाच्या मार्गाने अनेक बाबी ऑनलाईन करून विद्यार्थ्यांच्या प्रश्नाचे निराकरण केले जाईल  असे  कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी सांगितले.