जवाहर नवोदय विद्यालय पुर्व परीक्षा कडक निर्बंधात घ्या

0
18

गडचिरोली,दि.30 एप्रिल-जवाहर नवोदय विद्यालय पुर्व परीक्षा कडक निर्बंधात घेऊन प्रत्येक विद्यार्थ्यांचे गुण जाहीर करावे व शहरी भागातील निवड आरक्षण कायम ठेवावे अशी मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांना निवेदनाद्वारे केली आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण १९८६ नुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे करीता एका जिल्हयात एक जवाहर नवोदय विद्यालयाची स्थापना करण्यात आली. सदर शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अतिशय माफक दरात दर्जेदार शिक्षण दिले जाते. सदर शाळेत इयत्ता ६ वी ते १२वी पर्यंत शिक्षण सुविधा उपलब्ध असुन इयत्ता ६ वी प्रवेशाकरीता पूर्व परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांची निवड केली जाते. मात्र यातील ७५ टक्के जागा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी व २५ टक्के जागा शहरी भागाकरीता आरक्षीत असतांना मागील २ वर्षापासुन शहरी भागातील विद्यार्थ्यांचे आरक्षण कमी करून शहरी भागातून ४ ते ५ विद्यार्थ्यांची निवड केली जात आहे. त्यामुळे वर्षभर पूर्व परीक्षेची तयारी करणाऱ्या शहरी भागातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे.

तसेच ग्रामीण भागातील जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा केंद्रावर बरेच शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना मदत करतात त्यामुळे गुणवंत विद्यार्थी मागे पडत आहेत. त्यामुळे ही परीक्षा कडक निर्बंधात घेऊन प्रत्येक विद्यार्थ्यांचे गुण जाहीर करावे व शहरी भागातील निवड आरक्षण कायम ठेवावे अशी मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी जिल्हाधिकारी संजय मीना यांचेकडे केली आहे. तसेच शासनाने योग्य ती कार्यवाही न केल्यास जनहित याचीका दाखल करण्यात येईल असा इशारा निवेदनातून विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिला आहे.

यावेळी मनोज गुरुनुले, गोविंद नंदपूरकर, सिद्धार्थ नंदेश्वर, प्रीती ताकसांडे, अश्विनी तुलावी, मनीषा ताडमी, बालाजी भांडेकर, रेणुका गेडाम, कविता मडावी, सुनीता आलाम, प्रमोद खोबरे, नीलिमा सहारे, सोमेश्वर वैद्य आदी पालक उपस्थित होते.