Home शैक्षणिक आठवीपर्यंत पास?.. आता विसरा!

आठवीपर्यंत पास?.. आता विसरा!

0

विद्यार्थ्यांची पुढील वर्गाची ‘ढकलगाडी’ बंद; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी शक्यता
नवीदिल्ली (पीटीआय)– शालेय विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत अनुत्तीर्ण न करता उत्तीर्ण करून थेट पुढच्या वर्गात ढकलले जाण्याचा निर्णय बाद होण्याची शक्यता आहे. या निर्णयाचा फटका त्या विद्यार्थ्यांनाच बसत असल्याचे लक्षात आल्यानंतर या निर्णयाचा फेरविचार करण्याची शिफारस सीएबीईने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय शिक्षण अधिकार मंडळाने केली आहे.
शिक्षणाधिकार कायद्यात पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याची शिफारस आहे. या निर्णयामुळे ज्यांना काहीच येत नाही असे विद्यार्थी थेट नववीला जात असत. मात्र नववीत उत्तीर्ण होणे त्यांना कठीण जात असल्याचे चित्र आहे. तिसरी व पाचवीच्या मुलांना पहिलीचे पुस्तकही वाचता येत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे सतत वरच्या वर्गात ढकलण्याची ही पद्धत बंद करण्यात येणार आहे.
केंद्रीय शैक्षणिक सल्लागार मंडळ (सीएबीए) या निर्णयावर अंतिम निर्णयाची वाट बघत असून तो निर्णय हिवाळी अधिवेशात डिसेंबरअखेरीस होणार आहे. हरयाणाच्या शिक्षणमंत्री गीता बुक्कल यांच्या नेतृत्वाखाली उपसमिती स्थापन करण्यात आली असून त्यात विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात घालण्याचे धोरण बदलण्यावर विचार करण्यात आला. वर्ग परीक्षा घेण्यात याव्यात, अशी पालक व शिक्षकांची मागणी होती. मनुष्यबळ विकास राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह यांनी लोकसभेत या समितीच्या शिफारशींची माहिती दिली.
निर्णय घेण्याची कारणे
*विद्यार्थ्यांना नापास होऊनही वरच्या वर्गात ढकलले जात होते.
*आठवीला आल्यानंतर त्यांना काहीच येत नसल्याचे चित्र आहे.
*तिसरी, पाचवीच्या विद्यार्थ्यांना पहिलीची पुस्तके वाचता येत नव्हती.
*दहावीच्या विद्यार्थ्यांचा दर्जा घसरला होता. वीस राज्यांनी मुलांना वरच्या वर्गात ढकलण्याच्या पद्धतीला विरोध केला होता.
विद्यार्थ्यांना नापास होऊनही वरच्या वर्गात ढकलल्याने साठ टक्के विद्यार्थ्यांचे नुकसान होत असे. त्यामुळे ही पद्धत बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल. आता दहावीची परीक्षाही अत्यंत कडक पद्धतीने होणार असून तिला पूर्वीचे महत्त्व प्राप्त होणार आहे.
– स्मृती इराणी, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री

error: Content is protected !!
Exit mobile version