निवडणूक कार्यक्रमामुळे शिक्षक गुणगौरव पुरस्कार सोहळा लांबणीवर

0
10

गोंदिया-शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणार्‍या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या तसेच त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने राज्याच्या शालेय शिक्षण क्रीडा विभागाकडून दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो.
सन २0२१-२२ या वषार्साठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराकरीता २९ डिसेंबर रोजी शासन निर्णय निर्गमित करून निवड झालेल्या शिक्षकांची यादी प्रसिध्द करण्यात आली. त्याचबरोबर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ३ जानेवारी रोजी पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. मात्र राज्यातील विधान परिषद मतदार संघाचा निवडणूक कार्यक्रम जाहिर झाल्याने आयोजित सोहळा कार्यक्रम स्थगीत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी गोंदिया जिल्ह्यातील चार शिक्षकांची निवड झाली आहे.
सन १९६२-६३ पासून राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्?या शिक्षकांची निवड करून त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले जाते. मात्र सन २0२१-२२ पासून या पुरस्काराचे निकष सुधारीत करून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार या नावाने पुरस्कार वितरीत करण्यात येतो.
सन २0२१-२२ या शैक्षणिक सत्रासाठी राज्यातील १0८ शिक्षकांची राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. यामध्ये प्राथमिक विभागातील ३८, माध्यमिक विभागातील ३९, आदिवासी क्षेत्रातील १८, आदर्श शिक्षिका पुरस्कारासाठी ८, दिव्यांग विभागातील १ व स्काऊट गाईड विभागातील २ शिक्षकांचा समावेश आहे. या पुरस्कारासाठी निवड झालेल्या राज्यातील शिक्षकांची यादी २९ डिसेंबर रोजी राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शासन निर्णयाच्या माध्यमातून प्रसिध्द केली. दरम्यान क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मुंबई येथे पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. मात्र विधान परिषदेचा निवडणुक कार्यक्रम जाहिर झाल्यामुळे सदर कार्यक्रम स्थगीत करण्यात आला आहे. यामुळे आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांना पुरस्कारांकरीता प्रतिक्षा करावी लागणार आहे.

जिल्ह्यातील चार शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी गोंदिया जिल्ह्यातील ४ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. थोर समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक पुरस्काराकरीता गोरेगाव तालुक्यातील तुमखेडा बु.जि.प.शाळेतील शिक्षिका सिंधू महेंद्र मोटघरे, आदिवासी क्षेत्रातून देवरी तालुक्यातील भरेर्गाव जि.प.शाळेतील शिक्षका ज्योती केशवराव डाभरे, राज्य शिक्षक गुणगौरव माध्यमिक विभागातून गोरेगाव येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे डॉ.प्रभाकर लोंढे तर प्राथमिक विभागातून सडक अर्जुनी तालुक्यातील परसोडी जि.प.शाळेचे शिक्षक हुमेंद्र रमेश चांदेवार यांची पुरस्काराकरीता निवड करण्यात आली आहे