Home शैक्षणिक संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचे पुणे येथे...

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचे पुणे येथे दु:खद निधन

0

अमरावती-संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे 8 वे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचे शनिवार दिनांक 28 जानेवारी, 2023 रोजी सकाळी 6.40 वा. पुणे येथील सह्रांद्री हॉस्पिटल येथे दु:खद निधन झाले. ते ऑक्टोबर महिन्यापासून आजारी होते. मध्यंतरी त्यांची प्रकृती स्थिरावली होती, पण अचानकपणे काल त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांची प्राणज्योत मालवली.
16 सप्टेंबर 2021 रोजी त्यांनी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे 8 वे कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारला. त्यापूर्वी ते अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद येथे वरिष्ठ सल्लागार म्हणून कार्यरत होते. पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे ते विभागप्रमुख होते. 27 ऑगस्ट, 1966 रोजी डॉ. दिलीप नामदेवराव मालखेडे यांचा जन्म झाला. अमरावती जिल्ह्रातील बहिरम करजगांव हे त्यांचे मूळ गाव.
रविवार दि. 29 रोजी अंत्यविधी
स्व. डॉ. दिलीप मालखेडे यांचे पार्थिव पुणे येथून अमरावतीला आणण्यात येत आहे. त्यांच्या पार्थिवावर दि. 29 रोजी सकाळी 10.00 वाजता हिंदू स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
शिक्षण क्षेत्राची मोठी हानी
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचेकडून शोकसंवेदना
कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांच्या दु:खद निधनाप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस तसेच अनेकांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांच्या दु:खद निधनाप्रसंगी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, सर्व संवैधानिक अधिकारी, शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, महाविद्यालयांमधील प्राचार्य, विद्यार्थी तसेच सर्व नागरिकांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

कुलगुरु डॉ. दिलीप मालखेडे यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

मुंबई, दि. २८ : संत  गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप मालखेडे यांच्या  निधनाबद्दल राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी दुःख व्यक्त केले आहे.संत  गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप मालखेडे यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दुःख झाले. डॉ. मालखेडे यांनी पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून तसेच अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे सल्लागार म्हणून उल्लेखनीय कार्य केले होते. विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासात आणि विशेषतः गुणवत्ता वाढविण्याच्या कार्यात त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या अकाली निधनामुळे शैक्षणिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करुन आपल्या शोकसंवेदना व्यक्त करतो, अशा शब्दात राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version