Home शैक्षणिक डॉ प्रभाकर लोंढे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मानित

डॉ प्रभाकर लोंढे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मानित

0

गोरेगाव/२५फेब्रुवारी—:स्थानिक शहीद जाण्या तिम्या जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय गोरेगाव येथे प्राचार्य पदावर कार्यरत असलेले डॉ. प्रभाकर लोंढे यांना महाराष्ट्र शासना व्दारा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.
२४ जानेवारी २०२३ ला मुंबई येथील रंग शारदा सभागृहात महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र शासनाचे शिक्षण क्षेत्रातील प्रमुख अधिकारी तसेच केंद्रीय मंत्री मंगल प्रसाद लोढा व इतर मान्यवरांच्या उपस्थिती पार पडलेल्या भव्य सोहळ्यामध्ये त्यांना हा पुरस्कार सपत्नीक प्रदान करण्यात आला.
शिक्षण क्षेत्रामध्ये संशोधक, साहित्यिक व शिस्तप्रिय कर्तव्यनिष्ठ उपक्रमशिल प्राचार्य म्हणून विशेष ओळख असलेल्या डॉ. प्रभाकर लोंढे यांच्या शिक्षण क्षेत्राला असलेल्या विशेष योगदानाबद्दल हा पुरस्कार महाराष्ट्र शासनाने बहाल केलेला आहे.
शिक्षण क्षेत्रातील त्यांची उच्च शैक्षणिक अर्हता, शालेय स्तरावर विद्यार्थ्यांचे राज्य स्तरापर्यंत दिलेले योगदान, विज्ञान प्रदर्शनातील प्राविण्य, पाठ्यपुस्तक मंडळास पाठ्यपुस्तक निर्मितीमध्ये योगदान, मराठी विश्वकोशातील शिक्षण विषयक नोंदी लेखनामधील योगदान, बालभारती साठी लघु शोध निबंध, क्यू आर कोड च्या माध्यमातून अध्यापन साहित्य निर्मिती, प्रभावी विविधांगी शैक्षणिक नवोपक्रम, आंतरराष्ट्रीय परिषदेतील सहभाग, आकाशवाणीच्या माध्यमातून अभ्यासक्रमावर आधारित मुलाखतींचे प्रसारण, याशिवाय शैक्षणिक संशोधनपर शोधनिबंध लेखन, वृत्तपत्रांमधून संपादकीय लेखन, नाविन्यपूर्ण उपक्रमांवर लेखन, तसेच विविध विषयांवर संशोधन पर पुस्तके, काव्यसंग्रह, नाट्यसंग्रह यांचे प्रकाशन ही शैक्षणिक व सहशालेय कार्य यासाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे.
महाराष्ट्रातील शिक्षण प्रक्रियेत एक शिक्षणतज्ञ, मार्गदर्शक म्हणून ओळख असलेल्या डॉ प्रभाकर लोंढे यांची नवोपक्रम व विविध विषयांवरील संशोधनपर लेखन नाविन्यपूर्ण आहे.
यापूर्वी सुद्धा शिक्षण मंत्री यांच्याकडून डॉ. लोंढे यांच्या शैक्षणिक कार्य तसेच उपक्रमांची दखल घेतली गेली होती आता महाराष्ट्र शासनाने २०२२ चा शिक्षण क्षेत्रातील सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार बहाल केल्याने आपल्या कार्याची पावती मिळाल्याचे समाधान डॉ प्रभाकर लोंढे यांनी व्यक्त केले आहे.
हा पुरस्कार आता पर्यंत चालू असलेल्या अविरत शैक्षणिक योगदानाचा परिणाम आहे. असे अभिमत डॉ प्रभाकर लोंढे यांनी व्यक्त केले.
त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांनी पुरस्काराचे श्रेय आपले गुरूजन, आई व परिवार याशिवाय शहीद जाण्या तिम्या जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय परिवार व अधिकारी वर्गाला दिलेले आहे.
या पुरस्काराच्या माध्यमातून मिळालेली रोख रक्कम आपल्या वैचारिक आणि शैक्षणिक प्रगतीचा पाया घालणाऱ्या कोंढाळा या छोट्या जन्मगावातील “त्रिवेणी संस्कार सार्वजनिक वाचनालयाला दान करणार असल्याचे डॉ प्रभाकर लोंढे यांनी सांगितले.

error: Content is protected !!
Exit mobile version