१६ व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेमध्ये पश्चिम विभागीय क्षेत्रात मुंबई विद्यापीठास प्रथम पारितोषिक

0
6
मुंबई, दि.११ मार्च: संसदीय कार्य मंत्रालय नवी दिल्ली यांच्या मार्फत आयोजित करण्यात आलेल्या १६ व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेमध्ये पश्चिम विभागीय क्षेत्रात मुंबई विद्यापीठास प्रथम पारितोषिक मिळाले आहे. विद्यार्थ्यांना संसदीय कार्यप्रणालीची ओळख व्हावी, त्यांच्यातील वक्तृत्व व नेतृत्वगुणांना वाव मिळावा यासाठी  संसदीय कार्य मंत्रालय नवी दिल्ली यांच्या मार्फत दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.

संसदीय कार्य मंत्रालयातर्फे आयोजित होत असलेल्या या स्पर्धेमध्ये संपूर्ण देशातील विविध विद्यापीठे सहभागी होतात. ही स्पर्धा २ स्तरावर संपन्न होते. प्रथम स्तर हा विभागीय स्तर असतो आणि अंतिम स्तर हा राष्ट्रीय स्तर असतो. पश्चिम विभाग स्तरावरील आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील निवडक ६० विद्यार्थी सहभागी झाले होते. मुंबई विद्यापीठाच्या दीक्षान्त सभागृहात संपन्न झालेल्या या स्पर्धेसाठी संसदीय कार्य मंत्रालयाच्या नियमानुसार परीक्षक म्हणून खा. गोपाळ शेट्टी, खा. उन्मेश पाटील आणि डॉ. तरुण अरोरा, अधिष्ठाता, स्कूल ऑफ लीगल स्टडीज्, केंद्रीय विद्यापीठ पंजाब यांनी काम पाहिले. मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. डी. टी. शिर्के, प्रभारी प्र- कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे आणि प्रभारी कुलसचिव प्रा. सुनिल भिरुड यांनी स्पर्धेतील सर्व विजेत्यांचे अभिनंदन करुन त्यांच्या भविष्कालीन वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थी विकास विभागाने या स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले होते. स्पर्धेसाठी मार्गदर्शक म्हणून प्रा. (डॉ.) हर्षद भोसले, अविनाश ओक आणि नीलेश सावे यांनी काम पाहिले.