टॅबलेट व सीम कार्डचा सदुपयोग करून भविष्य उज्ज्वल करा-सहायक आयुक्त विनोद मोहतुरे

0
5

महाज्योती मार्फत विद्यार्थ्यांना टॅबलेट व डाटा सीम कार्डचे मोफत वितरण

गोंदिया, दि. 13 : – महाज्योतीने विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली ही योजना निश्चितच लाभदायक आहे. महाज्योती यांच्यामार्फत वाटप करण्यात आलेल्या टॅबलेट व सीम कार्डचा विद्यार्थ्यांनी सदुपयोग करून आपले भविष्य उज्ज्वल करावे, असे प्रतिपादन सहायक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी केले. महाज्योती मार्फत विद्यार्थ्यांना टॅबलेट व डाटा सीम कार्डचे मोफत वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. कुठल्याही परीक्षेत यश प्राप्त करण्यासाठी जिद्द, चिकाटी व नियमित सराव असल्यास यश आपल्या पदरी पडते. त्यादृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

       विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ( महाज्योती), नागपूर व सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने जेईई, नीट व एमएचटी-सीईटी चे प्रशिक्षण घेणाऱ्या इमाव, विमाप्र व विजाभज विद्यार्थ्यांना कार्यक्रमात टॅब, टॅबलेट कव्हर, सीम कार्ड, हेडफोन व बॅग आदींचे मोफत वितरण करण्यात आले.

        सदर कार्यक्रम सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, गोंदिया यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पतंगा मैदान, गोंदिया येथे आयोजित करण्यात आला. सदर योजना वर्ग 10 वी उत्तीर्ण झालेल्या इमाव विमाप्र व विजाभज विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येते.

             विद्यार्थ्यांनी आपली शैक्षणिक उन्नती करून आपले भविष्य उज्ज्वल करावे हे उद्दिष्ट समोर ठेऊन महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर यांच्यामार्फत जेईई, नीट व एमएचटी-सीईटीचे प्रशिक्षण घेणाऱ्या 206 विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते टॅबलेट व सीम कार्डचे मोफत वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाज कल्याण सहायक आयुक्त विनोद मोहतुरे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून गोंदियाचे जिल्हा सांख्यिकी अधिकारी रूपेशकुमार राऊत उपस्थित होते. सहायक लेखाधिकारी संजय भांडारकर, मुख्याध्यापक रविशंकर इठुले व गृहपाल योगराज सावरबांधे अतिथी म्हणून मंचावरं उपस्थित होते.

              शिकवणी लाऊनच जेईई, नीट व एमएचटी-सीईटी परीक्षा पास करता येते असं नाही तर सेल्फ स्टडी करूनही या परीक्षेत आपल्याला यश प्राप्त करता येते. जेईई, नीट व एमएचटी-सीईटी  परीक्षेसाठी उपयोगी होईल अशे बरेचसे व्हीडीओ युट्यूबवर उपलब्ध आहेत, असे जिल्हा सांख्यिकी अधिकारी श्री. राऊत यांनी सांगितले.

 शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरीच्या संधी कोठे उपलब्ध असतात यावावतही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना वर्ग 8 पासूनच तयारी करायला पाहिजे, अशी सूचनाही राऊत यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केली. तसेच परीक्षेत यशस्वी होण्यासाठी गणित, विज्ञान, बुद्धिमत्ता, सामान्यज्ञान अशा सर्वच वावतीत निपूर्ण असणे गरजेचे आहे.

                कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कनिष्ठ लिपिक आशीष जांभूळकर यांनी केले. तर आभारप्रदर्शन समाजकल्याण निरीक्षक श्रीमती स्वाती कापसे यांनी केले.