शिक्षक पुरस्कारांचा ‘आदर्श’घोळ,शाळेच्या नावात खाडाखोड

0
45

गोंदिया,दि.04- 5 सप्टेंबर शिक्षकदिनाच्या निमित्ताने दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केले जातात.त्या आदर्श शिक्षक पुरस्काराची घोषणा 3 जानेवारीला गोंदिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केली.या घोषित केलेल्या यादीवरुन पुरस्कार निवडीत घोळ झाल्याचा दाट संंशय व्यक्त केला जात असून गोंदिया पंचायत समिती गटातून निवड झालेल्या शिक्षिकेच्या नावासमोरील शाळेच्या नावावरुन यादी तयार करतांना पात्र शिक्षकाला तर डावलले गेले नाही ना,अशा चर्चांना शिक्षकांच्याच गटात रंगल्या आहेत.यामुळे शिक्षण विभागातील सावळागोंधळ पुन्हा एकदा चर्चेला आलेला आहे.

शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या आदर्श शिक्षकांचा गौरव व्हावा, या उद्देशाने शिक्षकदिनी शिक्षकांना गौरवण्यात येते.या उद्देशाने शिक्षण विभागाने पुरस्कार प्रक्रिया ऑफलाइन केली. यात इच्छुक शिक्षकांनी स्वत:हून अर्ज व आवश्यक कागदपत्रे सादर केली होती.यातून अंतिम ८ शिक्षकांची निवड करण्यात आली.विशेष म्हणजे एकापेक्षा अधिक अर्ज असल्यास अर्ज करणाऱ्या शिक्षकांची मुलाखत यापुुर्वी घेतल्या गेल्या होत्या,मात्र यावर्षी या नियमाला फाटा देण्यात आल्याचे दिसून येत आहे.

त्यातच जाहिर झालेल्या या पुरस्काराच्या यादीकडे बघितल्यास गोंदिया पंचायत समिती स्तरावर ज्या शिक्षिकेची निवड या पुरस्काराकरीता झाली त्यांच्या नावापुढे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खर्रा लिहिलेले आहे.त्यानंतर त्या खर्रा या नावाला कापून त्या ठिकाणी गिरोला हे नाव लिहिण्यात आले.या खोडाखोडीवरुन खर्रा येथील शाळेच्या शिक्षकाचा सुध्दा या पुरस्काराकरीता अर्ज होता,हे स्पष्ट झाले असून निवड कर्त्या समितीने खर्रा शाळेच्या शिक्षकाच्या प्रस्तावालाच आपली पसंती दिली हे यावरुन स्पष्ट होते.मात्र माशी कुठे शिंकली आणि राजकारण शिरले कुणास ठाऊक खर्रा शाळेच्या नावाएैवजी गिरोला लिहून आले.आणि गोंदिया पंचायत समिती स्तरावरील या पुरस्काराच्या पात्रतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊन निवडकर्त्यांनी राजकारण केले की काय अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.

यंदा पुरस्काराच्या एकूण प्रक्रियेबद्दल आक्षेप नोंदवले जात असून शासननिर्णयातील नियम आणि प्रत्यक्ष पुरस्कार देताना पाळण्यात आलेले नियम पूर्णत:बगल देण्यात आल्याचे बोलले जात आहे.यामुळे पारदर्शक व इमानदारीने आपल्या शाळेची गुणवत्ता टिकवूून ठेवणाऱ्याना गुणवत्ता असतानाही पुरस्कार नाकारण्यात आले की काय असे चर्चा आहे.

आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार मिळवण्यासाठी इच्छुक असलेल्या आणि स्वतः माहिती पाठवणाऱ्या शिक्षकांच्या बाबतीत तर हा प्रकार खूपच गंभीर म्हणावा लागेल. ज्या कार्यपद्धतीचा ‘पारदर्शक’ म्हणून एवढा गाजावाजा होत आहे, ती अवलंबताना असे का व्हावे? अर्ज मागवण्याऐवजी पुरस्कारप्राप्त शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यवेक्षकीय यंत्रणा यांच्याकडूनच शिफारशी मागवता येतील काय, या दृष्टीनेही विचार होणे गरजेचे झाले आहे.

गोंदिया जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने प्राथमिक गटातून सौ.भारती तिडके जि.प.उच्च प्राथ.शाळा गिरोला गोंदिया यांची निवड केली आहे.त्याचप्रमाणे तिरोडा पंचायत समिती स्तर कु.निशा वंजारी,आमगाव पंचायत समिती स्तर ओंकार बिसेन,सालेकसा पंचायत समिती स्तर रोषणलाल लिल्हारे,देवरी पंचायत समिती स्तर वसंत नाईक व अर्जुनी मोरगाव पंचायत समितीमधून लाकेश्वर लंजे यांची निवड आदर्श शिक्षक पुरस्काराकरीता करण्यात आली आहे.माध्यमिक विभागातून 8 तालुक्यातून फक्त 2 तालुक्यातील शिक्षकांची निवड करण्यात आली,त्यामध्ये गोरेगाव येथील शहिद जान्या तिम्या जिल्हा परिषद हाय.च्या सौ.नंदा गजभिये व सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथील जिल्हा परिषद हायस्कुलचे सुनिल भिमटे यांची निवड करण्यात आली आहे.