भंडारा,दि.22- भंडारा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकांसह पदवीधर शिक्षकांच्या रिक्त असलेल्या जागांवर शासनाच्या आदेशानुसार सेवानिवृत्त शिक्षकांची भरती प्रकिया पुर्ण करण्यात आली आहे.जिल्ह्यातील 154 सेवानिवृत्त शिक्षकांनी कंत्राटी शिक्षक होण्यास समंती दिल्याने पहिल्या टप्प्यात निवड झालेल्या शिक्षकांना 20 फेब्रुवारी 2024 रोजी नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत.
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करण्यासाठी शाळांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात सेवानिवृत्ती शिक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने घेण्यात आला होता.या निर्णयाला शिक्षक संघटना व सुशिक्षित बेरोजगार युुवकांकडून विरोध ही झाला. मात्र शासनाच्या निर्णयानुसार जिल्हा परिषद शाळा व खाजगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळांमधील सेवानिवृत्त शिक्षकांमधून वीस हजार रुपये मानधनावर कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपाची सेवानिवृत्ती शिक्षक भरती करण्याची प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून राबविण्यात आली.