समग्र शिक्षा अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे 4 मार्चपासून मुंबईत बेमुदत आंदोलन

0
177

शासनाच्या दुर्लक्षामुळे संतप्त कर्मचारी; आमरण उपोषण करणार

गोंदिया : मागील १८ ते २५ वर्षांपासून तुटपुंज्या मानधनावर सेवा देणाऱ्या समग्र शिक्षा अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपली सेवेत कायम करण्याच्या प्रमुख मागणीसाठी ४ मार्च २०२५ पासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत काम बंद आंदोलन आणि आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. शासनाने अनेक विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम केले असताना, शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांकडे मात्र दुर्लक्ष करण्यात येत असल्याने राज्यभरात तीव्र नाराजी आहे.शासनाने दिले फक्त आश्वासन, निर्णय काहीच नाही! वारंवार आंदोलने, निवेदने आणि मागणीनंतरही शासनाने फक्त अभ्यास समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला. मात्र, सहा महिने उलटूनही या समितीची एकही बैठक न झाल्याने कर्मचाऱ्यांच्या संयमाचा बांध तुटला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, गोंदियात आमदार विनोद अग्रवाल, आ.विजय रहांगडाले, आ .राजकुमार बडोले, तसेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य नेते संभाजीराव थोरात आणि शिक्षक संघटना समन्वय समितीचे मधुकर काठोडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सहायक कार्यक्रम अधिकारी दिलीप बघेले, विषय साधन व्यक्ती वशिष्ठ खोब्रागडे, विनोद परतेके, वरिष्ठ लेखा सहाय्यक योगेश हरीणखेडे, मिलिंद कोपूलरवार, विकास मिश्रा व डाटा एन्ट्री ऑपरेटर कैलास खोब्रागडे उपस्थित होते.
कर्मचाऱ्यांची परिस्थिती गंभीर, शासनाने त्वरित निर्णय घ्यावा!या कर्मचाऱ्यांनी आपल्या आयुष्याची अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात योगदान देऊनही त्यांना अत्यल्प वेतनावर काम करावे लागत आहे. अनेक कर्मचाऱ्यांचे आकस्मिक निधन झाले, मात्र त्यांच्या कुटुंबियांना कोणतीही मदत मिळालेली नाही. आता या कर्मचाऱ्यांनी संघर्षाचा मार्ग स्विकारला असून, शासनाने त्वरित निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.शासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे आंदोलन शिक्षण व्यवस्थेवर मोठा परिणाम करू शकते, त्यामुळे शासन काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण राज्यभरातील शिक्षक व शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे लक्ष आहे.