
बुलढाणा,दि.२७–आजचा विद्यार्थी उद्याचा सक्षम नागरिक घडावा तसेच जागतिक स्तरावरील जीवन कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये विकसित व्हावीत या उद्देशाने जि प म उच्च प्राथमिक शाळा कदमापूर ता -खामगाव जि-बुलढाणा येथील शिक्षकवृंद सातत्याने नाविण्यपूर्ण उपक्रम राबवित असतात. यामध्ये क्रिएटिव्ह थिंकिंग, क्रिटिकल थिंकिंग, कम्युनिकेशन, कॉन्फिडन्स, कोल्याबोरेशन, कंपेशन या सहा जीवन कौशल्यांचा विकास व्हावा तसेच जागतिक शिक्षणाचे चार आयाम व भविष्यवेधी शिक्षणाच्या सहा पायऱ्या यांचा विचार करून येथील शिक्षक सातत्याने धडपडत असतात त्यातीलच एक उपक्रम म्हणजे ऑनलाइन विद्यार्थी बचत बँक. या बचत बँकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे विविध जागतिक स्तरावरील कौशल्य तसेच उद्याचा सक्षम नागरिक घडविण्याच्या उद्देशाने करायचे व्यवहार या सर्व बाबींचे जीवना भिमुख ज्ञान विद्यार्थ्यांना या उपक्रमाच्या माध्यमातून मिळत आहे. येथील विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशेतच बँकेचे व्यवहार अभिरूप पद्धतीने मिळत असल्याने तसेच प्रत्यक्ष बँक कशी चालते याचे प्रत्यक्ष ज्ञान विद्यार्थ्यांना या उपक्रमाच्या माध्यमातून मिळत आहे.
अभिरुप विद्यार्थी बचत बँकेचे संचालक मंडळात श्रीधर पल्हाडे-अध्यक्ष,राजेश कोगदे-मुख्य व्यवस्थापक,संचालकामध्ये गजानन घटे,सूर्यकांत हिवराळे,मॅझिनी बायदानी,प्रमोद पटोकार,अनंत होगे,गणेश राऊत,प्रदीप राऊत,दीपक खडसान यांचा समावेश आहे.
आमच्या बालबचतबॅंकेचे 150 खातेदार असून बचतबॅंकेत 14030 रुपये जमा आहेत.विद्यार्थ्याने पैसे जमा केले किंवा काढले तर तो मेसेज आईवडील यांच्या मोबाईलवरसुद्धा जातो.त्यामुळे आपला पाल्य घरुन नेलेल्या पैशाचा उपयोग कसा करत आहे हे पालकांना लगेच कळते. व्यवहार ऑनलाइन पद्धतीने होत असल्याने विद्यार्थ्यांना बॅंकेचे प्रत्यक्ष ज्ञान शाळेत मिळत आहे.बचत केलेल्या पैशाचा सदुपयोग विद्यार्थी करत आहेत.
*राजेश वासुदेव कोगदे* ,शिक्षक तथा मुख्य व्यवस्थापक ,विद्यार्थी बचत बँक
विद्यार्थ्यांना जीवनाभिमुख शिक्षण मिळावे या उद्देशाने या बचत बँकेची निर्मिती शिक्षक राजेश कोगदे व सर्व शिक्षकवृंद यांच्या सहकार्याने केलेली आहे.भविष्यात दैनंदिन जीवनाशी निगडित कोणत्याही समस्यांना तोंड द्यावे लागू नये या उद्देशाने सर्व शिक्षकवृंद या उपक्रमासारख्या असंख्य उपक्रमांची अंमलबजावणी सातत्याने करत आहेत.
*श्रीधर पल्हाडे* उच्च श्रेणी मुख्याध्यापक जि प म उच्च प्राथमिक शाळा कदमापूर





