37.7 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home शैक्षणिक लोकप्रशासन विभागात शिक्षक दिन उत्साहात

लोकप्रशासन विभागात शिक्षक दिन उत्साहात

0
25

blank

नागपूर :राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर लोकप्रशासन व स्थानिक स्वराज्य शासन विभागाच्या वतीने शिक्षक दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. संजय पळवेकर, विश्वेश्वरैया राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था नागपूरचे माजी कुलसचिव डॉ. भास्कर गणवीर, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस डिग्री कॉलेज नागपूरचे प्राचार्य डॉ. धर्मेंद्र तुरकर, विभाग प्रमुख डॉ. जितेंद्र वासनिक आणि सहयोगी प्राध्यापिका डॉ. सुप्रिया डेव्हिड मंचावर विराजमान होते. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
प्रास्ताविकात अंकुश मराठे यांनी शिक्षकांचे विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्व अधोरेखित केले. शिस्त, निष्ठा व दृढनिश्चय या मूल्यांचे रोपण करून शिक्षक विद्यार्थ्यांना जीवनातील सर्व उच्च उद्दिष्टे साध्य करण्यास मार्गदर्शन करतात, असे त्यांनी नमूद केले.डॉ. भास्कर गणवीर यांनी आपल्या उद्बोधनात कौशल्य, अभ्यासक्रम आणि ज्ञान यांचा समन्वय साधणे हे अध्यापन-शिक्षण प्रक्रियेस सक्षम करण्यासाठी आवश्यक असल्याचे सांगितले. यामुळे शिक्षणाच्या मूलभूत उद्दिष्ट असलेल्या सर्वांगीण विकासाची पूर्तता होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
आपल्या व्याख्यानात डॉ. सुप्रिया डेव्हिड यांनी शिक्षक व विद्यार्थी यांच्या सहप्रवासाचे महत्त्व अधोरेखित केले. त्या म्हणाल्या,“शिक्षक हे भविष्याचे दीपस्तंभ आहेत. ते ज्ञानाचा प्रसार करून विद्यार्थ्यांचा मार्ग प्रकाशित करतात आणि समाजात परिवर्तन घडवून आणतात, असे सांगितले.
डॉ. धर्मेंद्र तुरकर यांनी आपल्या विद्यार्थी काळातील आठवणींना उजाळा देत शिक्षकांचे विद्यार्थी जीवनातील निर्णायक भूमिकेवर भाष्य केले. शिक्षकांकडून शिकत असताना आपण मानवतेचे विविध पैलू आत्मसात करतो आणि आपल्या क्षमतांचा सर्वोत्तम उपयोग समाजासाठी करू शकतो, असे त्यांनी अधोरेखित केले.
भारतीय तत्त्वज्ञानाच्या शाश्वततेचा उल्लेख करत डॉ. संजय पळवेकर यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना अभिवादन केले. तंत्रज्ञान प्रधान जगात मानवी नात्यांचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी गुरु-शिष्य परंपरेचा संदर्भ दिला आणि संत कबीर, वेद व्यास, गौतम बुद्ध यांची तत्त्वे ऐतिहासिक काळापासून आजतागायत सुशिक्षित होण्यास मार्गदर्शक ठरल्याचे सांगितले. “ही सर्वकालिक तत्त्वे आपल्याला धैर्य व संयम राखत उद्यमशीलता जोपासण्यासाठी मानव उन्नती साधण्यासाठी सातत्याने प्रेरित करतात,” असे त्यांनी नमूद केले.
आपल्या समारोपीय भाषणात डॉ. जितेंद्र वासनिक यांनी आजच्या काळातील शिक्षक व विद्यार्थी यांच्यासमोरील वैयक्तिक व सामूहिक अडचणींवर भाष्य केले व उज्ज्वल भविष्यासाठी आशा व्यक्त केली.
विभागातील विद्यार्थिनी हिना बोरकर यांनी संचालन केले तर आभार मयुरी गडलिंग यांनी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विभागातील सहाय्यक प्राध्यापक रमण शिवणकर, शिक्षक श्रीवर्धन केकतपुरे तसेच शिक्षकेतर कर्मचारी सौ. अनुसया पाटील, कु. समीक्षा मेहर व संदीप बोरकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

blank