Home शैक्षणिक अर्थप्राप्तीसाठी जगू नका; अर्थपूर्ण जगा-डॉ.अभय बंग

अर्थप्राप्तीसाठी जगू नका; अर्थपूर्ण जगा-डॉ.अभय बंग

0

गडचिरोली, ता.२२-पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांनी अर्थप्राप्तीसाठी न जगता जीवनाचा अर्थ समाजात शोधून अर्थपूर्ण जीवन जगावे, असे आवाहन सुप्रसिद्ध समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी (ता. 22) येथे केले. गोंडवाना विद्यापीठाच्या द्वितीय दीक्षांत समारंभात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ व राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते समारंभाचे उदघाटन झाले. प्रमुख अतिथी म्हणून ख्यातनाम समाजसेवक डॉ.अभय बंग, कुलगुरु डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित उपस्थित होते. मंचावर कुलसचिव डॉ.विनायक इरपाते, अधिष्ठाता डॉ. राजाभाऊ मुनघाटे, डॉ. अमीर धमानी, डॉ. जाकीर शेख, डॉ. अंजली हस्तक, डॉ. आर.पी.इंगोले, डॉ.अशोक जिवतोडे, डॉ.माधुरी नासरे, डॉ.एम.बी. उत्तरवार, ग्रंथपाल डॉ.श्रीराम रोकडे उपस्थित होते.
डॉ. अभय बंग पुढे म्हणाले, जगाची अर्थव्यवस्था ८० टिनियम डॉलर असून, शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थी अर्थार्जनाकडे वळतात. उच्चशिक्षण घेतल्यानंतर ब-याच विद्यार्थ्यांचा कल पाश्चिमात्य देशांमध्ये नोकरी करण्याकडे असतो. परंतु विद्यार्थ्यांनी पश्चिमेकडे न बघता गडचिरोलीच्या पूर्वेकडे जावे. तेथील आदिवासींच्या समस्या सोडवून स्वधर्मपूर्ती करावी, असे आवाहनही त्यांनी केले. आदिवासी भागात रोज सफरचंद पडतात; मात्र तेथे न्यूटन जाऊन बसत नाही, अशी खंत व्यक्त करुन डॉ.बंग यांनी विद्यार्थ्यांना आदिवासी भागात परिवर्तन घडविण्याचा सल्ला दिला. विद्यापीठाला “गोंडवाना” नव्हे, तर “गोंडवन” या नावाने संबोधित करावे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
या समारंभात विविध विद्याशाखेतील ४३ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

Exit mobile version