Home शैक्षणिक अपंग शाळेतील कर्मचारी वेतनापासून वंचित

अपंग शाळेतील कर्मचारी वेतनापासून वंचित

0

गडचिरोली : अपंग शाळांना शासनाने अनुदान दिले नसल्याने या शाळांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मागील १५ वर्षांपासून वेतन मिळाले नाही. ही गंभीर समस्या सोडविण्यात यावी, अशी मागणी चंद्रपूर, गडचिरोली जिल्हा अपंग शाळा कर्मचारी कृती समितीच्यावतीने वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

अपंग शाळा अनुदानास पात्र असतानासुद्धा शासनाने या शाळांना अनुदान दिले नाही. १९ जुलै २००३ च्या शासन निर्णयानुसार ‘अ’ व ‘ब’ श्रेणीत असलेल्या शाळांना अनुदान देण्याची तरतूद आहे. यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी घेण्याची आवश्यकता नाही. तरीही या शाळांना अनुदानापासून वंचित ठेवण्यात आले आहे. अपंग शाळांना अनुदान मिळावे, यासाठी राज्याच्या वित्त विभागाने मंजुरी दिली असून तसे आदेश निर्गमित केले आहेत. मात्र सामाजिक न्याय विभागाने या आदेशाकडे दुर्लक्ष केले आहे. ‘अ’ व ‘ब’ श्रेणीतील १५५ शाळांना अनुदान देण्यासाठी ६२ लाख रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. अर्थमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून शाळांना अनुदान देण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनातून केली आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अय्याज शेख व सचिव संजय नाकतोडे उपस्थित होते.

Exit mobile version