
वाशिम, दि. ०३ : राज्यात कोविड-१९ साथीच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्राशी संलग्नित सेवांसाठी लागणारे कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्यावतीने मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबिण्यात येणार आहे. त्याच अनुषंगाने जिल्ह्यातील २० बेड क्षमतेपेक्षा जास्त क्षमतेच्या २२ खासगी रुग्णालयांकडून जवळपास २२९२ युवक-युवतींना ३६ विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
जिल्ह्यात आरोग्याशी संबंधित सेवा देताना खासगी डॉक्टरांकडे प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून दर्जेदार आरोग्याच्या सेवा मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमातून उपलब्ध होणार आहे. या अनुषंगाने २ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर आणि जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांच्या प्रमुख उपस्थितीत खाजगी रुग्णालयांचे डॉक्टर्स या बैठकीला उपस्थित होते.
यावेळी डॉ. राठोड म्हणाले, खाजगी रुग्णालयांना ज्या क्षेत्रासाठी त्यांच्या कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे, त्यासाठी पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. प्रशिक्षणातून खाजगी हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले कर्मचारी तसेच प्रशिक्षण घेण्यास इच्छुक युवक -युवतीमुळे कुशल प्रशिक्षित मनुष्यबळ मिळण्यास या कार्यक्रमाचा उपयोग होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. आहेर म्हणाले, ज्या खाजगी हॉस्पिटलची बेड क्षमता २० पेक्षा जास्त आहे, तेथे जे कर्मचारी काम करतात त्यांना तांत्रिक प्रशिक्षण देण्याची व्यवस्था या कार्यक्रमातून होणार आहे. कमीत कमी ५ ते जास्तीत जास्त ३० व्यक्तींना या कार्यक्रमातून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची तांत्रिक कौशल्ये विकसित होण्यास मदत होणार आहे.काही बेरोजगार युवक-युवतींना देखील या माध्यमातून रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
श्रीमती बजाज म्हणाल्या, कोरोना संसर्ग काळात आरोग्याची काळजी घेणे हा महत्त्वाचा विषय आहे. खाजगी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची सेवा व उपचार करताना विविध प्रकारची उपकरणे हाताळताना प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता असते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पूर्व कौशल्य असलेल्या व्यक्तीला सुद्धा प्रशिक्षण देऊन त्यांना संबंधित प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच हॉस्पिटलला सुध्दा कौशल्यपूर्ण मनुष्यबळ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील खाजगी हॉस्पिटलकडून ३६ पैकी ३० प्रकारच्या प्रशिक्षणाची मागणी करण्यात आली आहे. कमीत कमी पाचवी ते जास्तीत जास्त बीएएमएस पर्यंतची शैक्षणिक पात्रता या कार्यक्रमाकरिता असणार असल्याचे त्या म्हणाल्या.
यावेळी उपस्थित खासगी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी या कार्यक्रमाविषयीची अधिक माहिती जाणून घेतली. बैठकीला नोडल अधिकारी डॉ. उमेश मडावी, डॉ प्रवीण ठाकरे, डॉ. अनिल कावरखे, डॉ. सिद्धार्थ देवळे, डॉ. सचिन पवार, डॉ. अनिल कड, डॉ. विजय काकडे व डॉ चंद्रकांत घुगे यांची उपस्थिती होती.