मनरेगा योजनेत जिल्ह्याने पूर्ण केले ११४ टक्के उद्दिष्ट

0
19
MGNREGA WORK AT Burdwan District. ----- PHOTO BY SANJOY KARMAKAR, BURDWAN

 गोंदिया,दि.16 :  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत गोंदिया जिल्हयात सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात १ एप्रील २०२२ पासून आतापर्यंत एकुण २१४ कोटी ५१ लाख २८७ रुपये निधी खर्च झाला असून त्यामधून ५८ लक्ष ४ हजार मनुष्य दिवस निर्मिती झालेली आहे. ५०.६८ लक्ष मनुष्य दिवस निर्मितीचे उद्दिष्ट असतांना गोंदिया जिल्ह्यात आज अखेर ११४.५२ उद्दिष्ट साध्य झाले आहे. या आर्थिक वर्षात १ लाख ७२ हजार ३८३ कुटूंबांना रोजगार पुरविण्यात आला आहे. त्यापैकी ६ हजार ३०३ कुटूंबांना शंभर दिवस रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

          जिल्हयाने सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात गोंदिया जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांच्या मार्गदर्शनाखाली वैयक्तिक लाभामध्ये सिंचन विहिर, गुरांचा गोठा, शौचालय बांधकाम, घरकुल बांधकाम, शेळ्यांचा गोठा, कुक्कुटपालन शेड, नॉडेप खत, गांडूळ खत निर्मितीसाठी टाकी तसेच पाणी टंचाईची समस्या सोडविण्यासाठी शोष खड्डे इत्यादी कामांचे नियोजन करुन आर्थिक वर्षात लेबर बजेटच्या लक्षांक ५० लक्ष ६८ हजार मनुष्य दिवस नुसार ५८ लक्ष ४ हजार मनुष्य दिवस उद्दिष्ट साध्य केले आहे.

         एकंदरीत जिल्हयात मगांराग्रारोहयो अंतर्गत ग्रामपंचायतीमध्ये मोठया प्रमाणात विकासाचे कामे उदा. मातीबांध, पांदन रस्ते, सिंचन विहिरी, रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड, भातखाचर, शौचालय, नाला सरळीकरण, तलावातील गाळ काढणे, तलावाचे खोलीकरण, शेततळे, वनतळी, मैदान सपाटीकरण करणे, मातोश्री ग्रामसमृध्दी शेत व पांदण रस्ते इत्यादी कामे होत आहे. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात गोंदिया जिल्हयात एकूण ८ हजार २७४ कामे सुरु करण्यात आली असून त्यापैकी ०१ हजार ६५७ कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

          सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात ५०.६८ लक्ष मनुष्य दिवस निर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आले असून, लेबर बजेटचे उद्दिष्ट प्रमाणे आज अखेर ११४.५२ उद्दिष्ट साध्य झाले आहे. जास्तीत जास्त मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने कामाचा नियोजन आराखडा तयार करण्यात आलेला आहे. त्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये कामे सुरु करुन जास्तीत जास्त कुटुंबांना शंभर दिवस रोजगार उपलब्ध करुन देण्यात येईल. सध्या जिल्हयात सेल्फवर ०९ हजार ७४६ कामे आहेत.