Home रोजगार नवकौशल्य,रोजगार संधी यांचा तरुणाईने लाभ घ्यावा-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवकौशल्य,रोजगार संधी यांचा तरुणाईने लाभ घ्यावा-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

अकोला,दि.13 राजर्षी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराच्या माध्यमातून राज्य शासन रोजगार इच्छुक आणि संधी यांना जोडण्याचा प्रयत्न करीत आहे. शासनाच्या या उपक्रमात आपण सहभाग द्यावा. या शिबिरांच्या निमित्ताने आपल्या समोर येणारे नवकौशल्य, दर्जेदार शिक्षण- प्रशिक्षण आणि रोजगार संधी याचा तरुणाईने लाभ घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालक मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्था व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आज नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय  येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीराचे आयोजन करण्यात आले. शिबीराचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे करण्यात आले. या कार्यक्रमास विधानपरिषद  सदस्य आमदार अमोल मिटकरी, आमदार वसंत खंडेलवाल, विधानसभा सदस्य आमदार गोवर्धन शर्मा तसेच जिल्हाधिकारी निमा अरोरा, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, शिक्षणाधिकारी (माध्य.) सुचिता पाटेकर, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, सुचना विज्ञान केंद्राचे नितीन चिंचोले, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त द.ल. ठाकरे, जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी गजानन चोपडे तसेच या शिबिरात युवक युवतींना  समुपदेशन, रोजगारांच्या संधी, नवीन तंत्रज्ञान व करिअर याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक डॉ. ज्ञानसागर भोकरे, गजानन कोरे,सचिन बुरघाटे उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

युवकांनी व पालकांनीही लाभ घ्यावा- उपमुख्यमंत्री फडणवीस

त्यानंतर दूरदृष्य प्रणालीद्वारे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिबिराचे उद्घाटन करुन उपस्थितांशी संवाद साधला. ते म्हणाले की, राज्यात सर्व २८८ विधानसभा मतदार संघात हा उपक्रम घेण्यात येत आहे.  १० वी,  १२ वी नंतर नव्या शिक्षण, प्रशिक्षणाच्या वाटा आणि रोजगाराच्या संधी विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना माहिती व्हाव्या. तसेच स्वयंरोजगाराच्या संधी, त्यासाठी मिळणारे अर्थसहाय्याचे मार्ग हे ही माहिती व्हावे यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. बदलत्या काळाला अपेक्षित उद्योगांतील कौशल्याच्या मागणीनुसार विविध अभ्यासक्रम तयार करुन त्याचे प्रशिक्षण युवकांना देणे. त्यातून त्यांना रोजगाराची संधी किंवा स्वतः उद्योजक बनण्यासाठी आवश्यक कौशल्याचा विकास, समुपदेशन हे सगळं या शिबिरातून दिलं जाईल, त्याचा युवकांना लाभ घ्यावा,असे आवाहन त्यांनी केले.

आपणच व्हावे आपल्या जीवनाचे शिल्पकार- आ.मिटकरी

विधानपरिषद सदस्य आ. अमोल मिटकरी यांनी सांगितले की, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने शासनाने हा एक स्तुत्य उपक्रम सुरु केला आहे. वाढते बेरोजगारीचे प्रमाण ही चिंतेची बाब असून या उपक्रमांचा उपयोग प्रत्यक्ष संधी उपलब्ध होण्यात व्हावा. जिल्ह्यात कापूस प्रक्रिया उद्योगाची उभारणी व्हावी. त्यातून स्थानिक पातळीवरच रोजगार संधी मिळेल. उभारण्यात आलेले उद्योग हेच बेरोजगारीच्या समस्येचे उत्तर आहे. छत्रपती शाहू महाराजांनी करांमधून  मिळणारे उत्पन्न हे शिक्षणाच्या योजना राबविण्यासाठी वापरले. त्यातून निर्माण झालेल्या शिक्षीत आणि प्रशिक्षीत मनुष्यबळामुळे राज्याचा विकास झाला. ज्या अर्थी,या उपक्रमाला शाहू महाराजांचे नाव देण्यात आले आहे त्या अर्थी  शाहू महाराजांच्या नावाला साजेसे कार्य या उपक्रमातून व्हावे,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आ. मिटकरी पुढे म्हणाले की, या शिबिराला उपस्थित युवक युवतींनी मिळणाऱ्या माहितीचा लाभ घ्या. त्यातून मिळणाऱ्या संधीचे सोने करा. आपण स्वतः आपल्या मेहनत आणि हुशारीच्या बळावर प्रगती करा. आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार व्हा, असा संदेश त्यांनी उपस्थित तरुणाईला  दिला.

स्वयंरोजगाराकडे वळा- जिल्हाधिकारी निमा अरोरा

जिल्हाधिकारी निमा अरोरा म्हणाल्या की, जिल्ह्यात रोजगार संधी उपलब्ध करुन देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. दर महिन्याला रोजगार मेळावे घेतले जातात. त्यातून अनेकांना संधी मिळत आहे. आजच्या शिबिराच्या माध्यमातून मिळणारी माहिती व मार्गदर्शन महत्त्वाचे आहे. आयटीआय सारख्या संस्थांमधून दिले जाणारे विविध व्यवसाय अभ्यासक्रम हे केवळ नोकरीची संधीच देत नाही तर स्वयंरोजगाराची संधीही देतात. युवकांनी स्वतः स्वयंरोजगाराकडे वळावे. त्यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. त्यांची माहिती घ्यावी,असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

प्रास्ताविक गजानन चोपडे,आभारप्रदर्शन द.ल. ठाकरे तर सूत्रसंचालन गटनिदेशक मंगेश पुंडकर यांनी केले.

शिबिरानिमित्त विविध संस्था व शासनाच्या विभागांनी रोजगाराभिमुख अभ्यासक्रम तसेच विविध कर्ज योजना आदींची माहिती देणारे स्टॉल्स लावले होते. तेथेही विद्यार्थ्यांनी भेट देऊन माहिती जाणून घेतली. तसेच दिवसभराच्या सत्रात तज्ज्ञ मार्गदर्शकांनी त्यांना विविध विषयांवर मार्गदर्शनही केले. याशिबिराला शेकडो युवक युवती उपस्थित होते.

error: Content is protected !!
Exit mobile version