परभणी, दि. 14 : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत जिल्ह्यातील पॅरामेडीकल, फिजिओथेरपी क्षेत्रातील बेरोजगार उमेदवारांना इस्त्रायल येथे उत्तम पगाराच्या रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असणाऱ्या, वय वर्षे 25 ते 45 वयोगटाचे उमेदवार या योजनेमध्ये सहभागी होण्यास पात्र आहेत. सोबतच उमेदवारांकडे काळजीवाहू (घरगुती सहायक) सेवांसाठी निपूण/पारंगत, भारतातील नियामक प्राधिकरणाव्दारे मान्यताप्राप्त असलेले व किमान 990 तासांचा कोर्स पूर्ण केलेले प्रमाणपत्र किंवा मिडवायफरी कोर्स/नर्सिंग (जीएनएम/एएनएम/बीएससी नर्सिंग/एमएसस्सी नर्सिंग)/फिजिओथेरपी/नर्स असिस्टंट इत्यादी मधील प्रशिक्षण पुर्ण केल्याचे शासनमान्य प्रमाणपत्र आवश्यक आहे. तरी गरजू स्त्री/पुरुष उमेदवारांनी https://maharashtrainternational.com/jobDetail.aspx या वेबसाईटवर त्वरीत नोंदणी करून सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त प्र.सो. खंदारे यांनी केले आहे.