… आणि शाहू मिल गहिवरली..!

0
19

एकीकडं राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनातील अनेक प्रसंग विषद करणारं छायाचित्र प्रदर्शन.. तर दुसरीकडं 100 हून अधिक कलाकारांनी रेखाटलेली छायाचित्रं आणि शिल्पं.. तर दुसर्‍या ठिकाणी खाद्य जत्रा.. शाहू मिलच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या कामगारांनी इथल्या विविध दालनांना भेटी देत जुन्या आठवणींना उजाळा दिला.. आपल्या जीवनातील अमूल्य वेळ ज्यांनी शाहू मिलच्या वास्तूत व्यतीत केला, त्यांचा सहवास मिळाल्यामुळं शाहू मिलची वास्तूही गहिवरली असेल.. निमित्त होतं.. जिल्हा प्रशासनाच्या वतीनं कामगार दिनानिमित्त शाहू मिलच्या कामगारांच्या सत्कार सोहळ्याचं..

पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्हा प्रशासनाच्या वतीनं कोल्हापुरात सुरु असलेल्या लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी निमित्त ‘कृतज्ञता पर्व’ साजरं होत आहे. राजर्षी शाहू महाराजांनी सुरु केलेल्या शाहू मिलमध्ये काम करणाऱ्या कामगारांचा 1 मे महाराष्ट्र दिनी म्हणजेच कामगार दिनानिमित्त जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरही उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, आज आपण जिथं बसलो आहोत, त्या ठिकाणी आपण आपलं आयुष्य घालवलंय. शाहू महाराजांचं स्मरण करुन त्यांनी स्थापन केलेल्या या मिलमध्ये तुम्ही रात्रंदिवस मेहनत केली आहे. तुम्ही तुमच्या मेहनतीनं शाहू महाराजांचं नाव सार्थ करण्याचा संपूर्ण प्रयत्न केला आहे. तुम्हाला ही मिल बंद होताना पहावं लागलं.. पण सुदैवानं सुमारे 20 वर्षानंतर तुम्हा सर्वांना ही मिल परत एकदा उघडलेली पहायला मिळाली. त्या काळी फक्त तुमच्यासाठी खुली असणारी ही मिल आता सगळ्यांसाठी खुली होण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करुया.

श्री शाहू छत्रपती मिलची वास्तू अतिशय सुंदर असून इतक्या विस्तीर्ण जागेत अशी देखणी वास्तू पहायला मिळणं कठीण आहे. 100 वर्षांचा काळ लोटला तरीही अजुन ही वास्तू सुस्थितीत आहे. या इमारतीचं वैभव पाहता महाराजांनी आपल्या पुढच्या पिढ्यांवर टाकलेला विश्वास सार्थ करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. विश्वासाला जागण्याची कोल्हापुरची परंपराच आहे आणि आपण कोल्हापुरकरांनींच ती पार पाडायला हवी. आज ही शाहू मिल ज्या स्वरुपात आहे, तिचं गतवैभव परत एकदा तिला मिळवून देण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करुया. आपल्या येणाऱ्या पिढ्यांना, लेकरांना हा वारसा अधिक संवर्धित करुन द्यायचा आहे.. तो आपण करु… आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली सर्वजण मिळून करु.. आणि आपल्या शाहू मिलचं नाव आणखी उज्वल होण्यासाठी प्रयत्न करु…आधी ही वास्तू शाहू महाराजांनी स्थापन केलेली कापड (टेक्सटाईल) मिल होती.. आता आपण याठिकाणाला समृध्द स्वरुप तयार करण्यासाठी प्रयत्न करु.. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून यासाठी प्रयत्न होत आहेत. त्यांच्या प्रयत्नातून राज्य शासनाच्या मदतीने या शाहू मिलला आणखी सुंदर करण्याचा प्रयत्न करुया.. ! असं हृदयस्पर्शी आवाहन करुन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कामगार दिनाच्या सर्व कामगारांना शुभेच्छा दिल्या.

 

– वृषाली पाटील, माहिती अधिकारी,

जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर.