Home Featured News कृषी विद्यापीठांचे अनुदान बंद करा – गडकरी

कृषी विद्यापीठांचे अनुदान बंद करा – गडकरी

0

नागपूर – शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कृषी विद्यापीठांकडून नवनव्या संशोधनाची अपेक्षा आहे. मात्र, कृषी विद्यापीठे ही अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरली असून शेतकऱ्यांसाठी कुचकामी आहेत. त्यामुळे या कृषी विद्यापीठाचे अनुदान बंद करा, अशी सूचना केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी आज मुख्यमंत्र्यांना केली. विद्यापीठातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनाच स्वतःचे वेतन काढू द्या, असे संतप्त उद्‌गारही त्यांनी काढले.

रेशीमबाग येथे आयोजित “ऍग्रो व्हिजन‘ या कृषी प्रदर्शनाच्या उद्‌घाटन समारंभात ते बोलत होते. ते “ऍग्रो व्हिजन‘चे मुख्य प्रवर्तक आहेत. कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपुढे नवनवे संशोधन पुढे येत आहे. मात्र, कृषी विद्यापीठे निव्वळ पांढरे हत्ती ठरल्याची टीका त्यांनी केली. शेतकऱ्यांची स्थिती वाईट आहे. सरकार बदलल्याने शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन होईल असे नाही. सरकार स्वतःची जबाबदारी पार पाडेलच. परंतु, शेतकऱ्यांत नवे तंत्रज्ञान पोहोचणे गरजेचे आहे. यासाठी यासारख्या प्रदर्शनाची गरज असल्याचे ते म्हणाले. प्रमुख पाहुणे म्हणून हरियाणाचे कृषिमंत्री ओमप्रकाश धनगड, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टी तर विशेष अतिथी म्हणून प्रदर्शनाच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. सी.डी. मायी उपस्थित होते. केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंग कार्यक्रमाला येणार होते, पण संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने ते येऊ शकले नाही.
सरकार शेतकऱ्यांचे आहे. त्यांनी घाबरू नये. आमच्यावर विश्वास ठेवावा, त्यांच्या मदतीसाठी प्रसंगी कर्ज काढण्याची वेळ आली तर सरकार तेही करेल, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आत्महत्या करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केले
सुरुवातीला स्वागतपर भाषण आयोजन समितीचे संयोजक गिरीश गांधी यांनी केले. समितीचे सचिव रवींद्र बोरटकर यांनी प्रदर्शनाची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर यांनी केले तर आभार आयोजन समितीचे सचिव रमेश मानकर यांनी मानले. व्यासपीठावर खासदार कृपाल तुमाने, रामदास तडस, आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, सुधाकर देशमुख, अनिल सोले, समीर मेघे, मल्लिकार्जुन रेड्डी, चंद्रपूरचे आमदार नाना श्यामकुळे, राजकुमार पडोले, अनिल बोंडे, हरीश पिंपळे, पंकज भोयर, महापौर प्रवीण दटके, जि.प.च्या अध्यक्ष निशा सावरकर, ‘वेद’चे अध्यक्ष देवेंद्र पारेख, माजी खासदार दत्ताजी मेघे, माजी मंत्री सुलेखा कुंभारे, डॉ. विकास महात्मे, रवींद्र दुरुगकर, राजीव पोतदार, श्रीधर ठाकरे, कृषी खात्याचे सचिव सुधीर गोयल यांच्यासह आयोजन समितीचे सर्व प्रमुख सदस्य आणि हजारो शेतकरी उपस्थित होते

Exit mobile version