Home Featured News दुष्काळाची पहाणी करण्यासाठी केंद्राचे पथक येणार-मंत्री एकनाथ खडसे

दुष्काळाची पहाणी करण्यासाठी केंद्राचे पथक येणार-मंत्री एकनाथ खडसे

0

नवी दिल्ली- महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्‍यांना दिलासा देण्याच्या उद्देशाने राज्यातील दुष्काळग्रस्त भागाची पहाणी करण्यासाठी केंद्रीय पथक येत्या दोन दिवसांत महाराष्ट्रात येणार आहे, असे आज राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आज नवी दिल्ली येथे सांगितले.
एकनाथ खडसे यांनी आज दिल्ली येथे खा.ए.टी.नाना पाटील, खा.रक्षाताई खडसे व खा.डॉ.सुभाष भामरे यांच्या समवेत केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली आणि कृषी मंत्री राधा मोहनसिंग यांची भेट घेऊन राज्यातील दुष्काळी परिस्थिती त्यांच्यासमोर मांडली व दुष्काळ निवारणासाठी केंद्र शासनाने महाराष्ट्राला जास्तीत जास्त मदत द्यावी, तसेच राज्यातील दुष्काळी भागाची पहाणी करावी, अशी विनंती केली. त्यांची विनंती दोन्ही केंद्रीय मंत्रयांनी तात्काळ मान्य केली व महाराष्ट्रात दुष्काळी भागाची पहाणी करण्यासाठी केंद्रातील वित्त व कृषी अधिकाऱ्‍यांचा समावेश असलेले एक पहाणी पथक तात्काळ पाठविण्याची ग्वाही दिली.
संरक्षण मंत्री पर्रीकरांची भेट
एकनाथ खडसे यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेतली व भुसावळ-वरणगांव येथील संरक्षण खात्याच्या अखत्यारीतील आयुध निर्माणीला भेट देण्याचे निमंत्रण दिले. पर्रीकरांनी हे निमंत्रण स्विकारले असून ते येत्या जानेवारी अखेर किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडयात जळगांव दौऱ्‍यावर येणार असल्याचे खडसे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, वरणगांव येथील आयुध निर्माणीमध्ये स्थानिक नागरिकांना चाळीस टक्के नोकऱ्‍या राखीव ठेवाव्यात, अशी आपण पर्रीकरांना विनंती केली आहे. या विनंतीचा केंद्र शासन गांभीर्याने विचार करील, असे पर्रीकर यांनी सांगितले. आपल्या दौऱ्‍यात वरणगांव येथील आयुध निर्माणीमधील 400 हेक्टर जागेचा विस्तार करण्यासंबंधी पर्रीकर पहाणी करणार असल्याचेही एकनाथ खडसे यांनी सांगितले.

Exit mobile version