पाच सी-६0 कमांडोंनी देशभरात केला ६५00 किमी बाईक प्रवास

0
15

गडचिरोली-अतिदुर्ग, आदिवासी संस्कृती, वनसंपदेने नटलेला गडचिरोली जिल्ह्याच्या विकासात येथे फोफावलेला नक्षलवाद अडसर ठरत आला आहे. या नक्षली कारवायांवर प्रतिबंध घालण्यासाठी १ डिसेंबर १९९0 रोजी जिल्हा पोलिस दलात सी-६0 तंदूरस्त व चपळ जवानांचे पथक तयार करण्यात आले. ‘वीरभोग्या वसुंधरा’ असे ब्रीदवाक्य घेऊन सेवारत असलेले या पथकाचे जवान नक्षल्यांसाठी कर्दनकाळ म्हणून देशभरात नावाजले गेले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत नक्षली चळवळीचा नायनाट करीत असताना शहीद झालेल्या पोलिस जवानांच्या सन्मानार्थ सी-६0 पथकाच्या पाच कमांडोनी पोलिसांची वीरगाथा सांगत शहीद जवानांच्या सन्मानार्थ बाईक यात्रा काढून देशभरातून ६५00 किमीचा प्रवास करीत १६ जानेवारी रोजी जिल्हास्थळ गाठले आहे. त्यांच्या या यशस्वी प्रवासाबद्दल पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी या वीर जवानांचा सत्कार केला.
नक्षल्यांचा कर्दनकाळ ठरलेले सी-६0 जवान नक्षल विरोधी कारवाया करतांना अत्यंत कठिण परिस्थितीत अनेक आव्हानांचा सामना करीत असतात. ऊन, वारा, पाऊस या कशाचीही तमा न बाळगता अहोरात्र जीवाची पर्वा न करता डोंगर-दर्‍या, घनदाट झाडीत ते अभियान राबवून आपले कर्तव्य पार पाडित आहेत. या जवानांच्या विशेष शौर्यामुळे नक्षल चळवळीसाठी सी-६0 पथक यमराज ठरत आले आहे. नक्षल्यांशी लढा देत असतांना शहीद झालेल्या जिल्हा पोलिस जवानांच्या गौरवशाली कार्यासह बलिदानाचा परिचय संपूर्ण देशाला करुन देण्यासाठी सी-६0 विशेष पथकातील जवान किशोर खोब्रागडे, राहुल जाधव, रोहित गोंगले, अजिंक्य तुरे व देवानंद अडोळे या ५ जवानांनी २५ डिसेंबर २0२२ ला बाईकद्वारे शहीद सन्मान यात्रा काढली. या यात्रेदरम्यान त्यांनी देशातील विविध राज्यात भ्रमण करीत १६ जानेवारी रोजी यात्रा पूर्ण करीत गडचिरोली जिल्हा मुख्यालय गाठले.

पाकिस्तान सीमावर्ती भागालाही जवानांची भेट
जिल्हा पोलिस दलाच्या पाच कमांडो जवानांद्वारे २५ डिसेंबर रोजी शहीद सन्मान यात्रेला सुरुवात करण्यात आली होती. दरम्यान, देशभरातील विविध राज्यात मार्गक्रमण करीत सदर जवान १६ जानेवारी रोजी जिल्ह्यात परतले. या प्रवासादरम्यान जवानांनी मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात राज्यातील विविध ठिकाणांना भेटी दिल्या. विशेष म्हणजे, राजस्थान राज्यातील पाकिस्तान सीमेलगत असलेल्या लोंगेवाला पोस्ट तथा तानोतमाता मंदिरालाही त्यांनी भेट दिली. या यात्रेदरम्यान जवानांनी जवळपास ६५00 किमीचा प्रवास पूर्ण केला.जवानांचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत
२५ डिसेंबर रोजी सुरुवात झालेल्या शहीद सन्मान यात्रेत सहभागी सी-६0 जवानांचे राज्यातील विविध जिल्ह्यासह परराज्यातील नागरिकांद्वारे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी स्वत: उपस्थिती दर्शवित सी-६0 जवानांचे मनोधैर्य वाढवित स्वागत केले. आगामी काळात भारताच्या पुर्व सीमेपासून पश्‍चिम सीमेपयर्ंत सन्मान यात्रा काढण्याचे लक्ष निर्धारित केले आहे. गडचिरोली जिल्हा पोलिस दलातील सी-६0 जवानांची माहिती संपूर्ण देशातील सुरक्षा यंत्रणेसह नागरिकांना करून देण्याचा शहीद सन्मान यात्रेमागील मुख्य उद्देश आहे.

नक्षल्यांशी लढताना आतापर्यंत २१२ जवान शहीद
जिल्ह्यात फोफावलेल्या नक्षली चळवळीला नेस्तनाबूत करण्यात जिल्हा पोलिस दलातील सी-६0 जवानांचे मोठे योगदान आहे. आतापयर्ंत नक्षल्यांशी दोन हात करीत असतांना तब्बल २१२ जवान शहीद झाले आहेत. यामध्ये सी-६0 पथकाच्या ६२ जवानांचाही समावेश आहे. जिल्हा पोलिस दलाने बजाविलेल्या शौर्यपूर्ण कार्याबद्दल आतापर्यंत ३ शौर्यपदक, ६ राष्ट्रपती पोलिस शौर्यपदक, १६ गुणवत्तापूर्ण सेवेकरिता राष्ट्रपती पोलिस पदक व १६१ पोलिस शौर्यपदक प्राप्त केले आहे. विशेष म्हणजे यातील सर्वाधिक पदक सी-६0 जवानांनी प्राप्त केले आहेत.