पौष्टिक तृणधान्य काळाची गरज

0
65

 संयुक्त राष्ट्राने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष घोषित केले आहे. याचाच एक भाग म्हणून गोंदिया जिल्ह्यातही विविध स्तरावर आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे केले जात आहे. कुपोषण समस्या व पोषणमूल्य सुधारण्यासाठी मिलेटचा आहारात वापर पुन्हा एकदा वाढविणे, त्यांची लागवड वाढविणे, त्यांच्या उपयुक्ततेबाबत समाजात जनजागृती करणे अत्यंत जरुरीचे आहे. याबाबत कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्यात जनजागृती करण्यात येत आहे. तृणधान्याची लागवड व त्याचा आहारात समावेश आरोग्यासाठी गरजेचा आहे ही बाब शेतकरी व नागरिकांना विविध उपक्रमांच्या माध्यमातून पटवून देण्यात येत आहे. नुकत्याच झालेल्या कृषी महोत्सवात पौष्टिक तृणधान्य या विषयावर जिल्ह्यातील महिला बचतगटांनी सकस आहार ही स्पर्धा आयोजित करून नागरिकांना तृणधान्याचे महत्त्व पटवून दिले.

         नवीन पिढीच्या व लहान मुलांच्या आवडीचे पदार्थ जसे की, ब्रेड, बिस्किट, केक, इडली, डोसा, चकली इत्यादी पदार्थ पौष्टिक तृणधान्यावर प्रक्रिया करुन बनविता येतात. असे पदार्थ बनवून त्यांचा आहारात सामावेश वाढविणे आवश्यक आहे. त्यास तृणधान्य वर्षाच्या निमित्ताने मदत होईलच. भारताने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्याचे उचललेले पाऊल हे भारताच्याच नव्हे तर, सर्व जगाच्या पोषण आणि आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे.

मिलेट म्हणजे काय?

        मिलेट अर्थात बारीक दाणे येणारे, माणसांना, प्राण्यांना आणि पक्षांना खाण्याजोगे पौष्टिक तृणधान्य/भरडधान्य. भारताच्या विविध प्रांतात होणारे आणि पूर्वपार चालत असलेले आपले मुख्य अन्न म्हणजे मिलेट होते. ज्वारी, बाजरी, नाचणी, कोदू, वरी, राजगीरा, राळ, कांग, सावा हे त्यांचे विविध प्रकार. आरोग्यासाठी पोषक मिलेट्स वापरातून मिळणारे आवश्यक पोषकांश-मिलेट्स किंवा पौष्टिक तृणधान्य/ भरडधान्य हे शरीरातील आम्लता कमी करणारे असून, ते ग्लुटेन विरहित, अत्यंत पोषक आणि पचनास सुलभ आहेत. मिलेट्सचा ग्लासेमिक इंडेक्स कमी असल्याने रक्तातील साखर संतुलित राखण्याचे कार्य तृणधान्य करतात. आहारातील यांच्या वापरामुळे वजन कमी होण्यास मदतच होते. कॅल्शियम, आयर्न, झिंक, फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम आदी महत्त्वाची शरीरावश्यक घटक द्रव्ये याच्यातून आपल्याला मिळतात. त्याचबरोबर आवश्यक तंतूमय पदार्थ म्हणजे फायबर्स, फॉलिक सिड, विटामिन बी 6, बीटा कॅरोटीन, बी -१ आणि चेतातंतूंचे कार्य अधिक सक्षम बनविण्यास लागणारे लेसिथिन याचे उत्तम स्त्रोत म्हणजे ही तृणधान्ये किंवा मिलेट्स असतात.

आहारात बाजरीचा समावेश

       आहारातील बाजरीचे तृणधान्यात जास्तीत जास्त ऊर्जा देणारे पिक आहे. यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करते. मॅग्नेशिअम व पोटॅशिअमचा उत्तम स्त्रोत-रक्तदाब नियंत्रीत करण्यास मदत होते तसेच वजन नियंत्रित करण्यास सुध्दा मदत होते. बाजरीमध्ये सल्फरयुक्त अमिनो आम्ल असल्यामुळे लहान मुले व गर्भवती मातांसाठी उपयुक्त आहे. यामुळे हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होते. हृदयास सक्षम बनवते. मधुमेह व कॅन्सर रोधक असते. आपल्या शरीरातील हाडांना मजबुती देण्याचे काम करते.

          केंद्र शासनाच्या कृषि व शेतकरी कल्याण विभागाने पौष्टिक तृणधान्य पिकांच्या उत्पादनात वाढ करणे, तृणधान्यांमधील पोषणमुल्यांमुळे त्यांचे आहारातील अनन्यसाधारण महत्व विचार घेऊन लोकांच्या आहारातील त्यांचा वापर वाढविण्याच्या दृष्टीने मुल्यवर्धीत उत्पादने तयार करणे अभिप्रेत असल्यामुळे रोजच्या आहारात पौष्टिक तृणधान्याचा वापर करा व निरोगी राहा. ख-या अर्थाने पौष्टिक तृणधान्य –  सशक्त महाराष्ट्र ही संकल्पना साध्य होण्यास मदत होणार आहे.

                                                                                        – जिल्हा माहिती कार्यालय, गोंदिया