Home Featured News बहुजनांच्या शोषणासाठीच संस्कृतचा अट्टाहास

बहुजनांच्या शोषणासाठीच संस्कृतचा अट्टाहास

0

वर्धा : बहुजनांच्या डोक्यावर सांस्कृतिक अधिपत्य लादण्यासाठीच हिंदू या शब्दाच वापर करणाऱ्या शक्ती बहुजनांना स्वत:ची संस्कृती, भाषा व जीवनच विसरायला भाग पाडत आहे. ज्या भाषेशिवाय आपण व्यक्त होऊ शकत नाही त्या भाषिक पातळीवरही बहुजनांचे शोषण सुरू असून संस्कृतचा अट्टाहास हा त्याचाच भाग आहे असे प्रतिपादन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते न्या. बी.जी. कोळसे पाटील यांनी केले.

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयात तिसरे लोकभाषा संमेलन १३ आणि १४ डिसेंबर रोजी घेण्यात येत आहे. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर स्वागताध्यक्ष दिनेश सवाई, डॉ. चेतना सवाई, उद्घाटन सत्राचे अध्यक्ष नागेश चौधरी, भाषा अभ्यासक अरूण जाखडे पुणे, कृषी कीर्तनकार महादेव भुईभार, लोकसाहित्यिक डॉ. मधुकर वाकोडे, बबन नाखले, जगन वंजारी, अरविंद देशमुख व संयोजक प्रा. नूतन माळवी उपस्थित होते.

न्या. कोळसे पाटील म्हणाले, फुले, आंबेडकरांनी बहुजनांना शिक्षित करण्याचा वसा उचलला. त्यातून शिक्षित झालेल्यांनी संविधानाची प्रस्तावना हातात घेवून शोषण मुक्त समाज निर्मितीसाठी लढले पाहिजे.

ज्ञानेश्वर, तुकारामांच्या काळापर्यंत सोपी असलेली मराठी ही मोरोपंतानी बिघडविली असे सांगत मधुकर वाकोडे म्हणाले, भाषा मेली की माणसे मरतात. आज चित्पावनांची भाषा ही प्रमाण भाषा बनल्यामुळे बहुजनांमध्ये सांस्कृतिक न्यूनगंड वाढून त्यांचा बौद्धीक विकास खुंटला आहे. आपल्या देशाव्यापी भाषिक सर्व्हेक्षणाचा अनुभव कथन करताना पद्मगंधाा प्रकाशनचे अरूण जाखडे म्हणाले, आपल्या देशात भाषिक वेदना प्रचंड आहेत. भाषा वाचविण्याचे काम हे केवळ भाषाशास्त्राचे नसून ते संपूर्ण समाजाचे आहे. सत्राचे अध्यक्ष नागेश चौधरी म्हणाले, आपल्या देशात फक्त मुठभर लोक संस्कृत बोलत असले तरी संस्कृतची ७२ विद्यापीठे आहेत. गोंडीसारखी लोकभाषा ३ लाखापेक्षा अधिक आदिवासी बोलत असूनही तिचे एकही विद्यापीठ नाही. भाषा हा राष्ट्रनिर्मितीतील महत्वाचा घटक असल्यामुळे बहुजनांची भाषा नष्ट करून अभिजनांचे राष्ट्र उभारणीचे षडयंत्र रचले जात आहे. डॉ. चेतना सवाई यांनी आयोजनाची भूमिका विषद केली. संचालन नरेन मून यांनी केले तर आभार प्राचार्य डॉ. मिलिंद सवाई यांनी मानले. यशस्वीतेकरिता जिजा बोरकर, सुनिता शंभरकर, प्रमोद नगराळे, नंदू धाबर्डे, प्रा. दत्तानंद इंगोले, प्राचार्य जनार्दन देवतळे, डकरे, मीनल इंगळे, प्रा. महाजन, प्रा. खोडे यांनी सहकार्य केले.

Exit mobile version