Home Featured News महाराष्ट्र केसरीसाठी येलभर वि. चौधरी यांच्यात लढत

महाराष्ट्र केसरीसाठी येलभर वि. चौधरी यांच्यात लढत

0

अहमदनगर- यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत जळगावचा विजय चौधरी आणि पुण्याचा सचिन येलभर यांच्यात मानाच्या गदेसाठी आज (रविवार) लढत होणार आहे. याबरोबरच यंदाच्या स्पर्धेतून नवा महाराष्ट्र केसरी अवघ्या महाराष्ट्राला मिळणार आहे. मातीच्या कुस्तीतून विजय चौधरीने अंतिम फेरी गाठली. दुस-याबाजूने मॅटवरून सचिनने अंतिम फेरीत प्रवेश केला.
मातीच्या प्रकारात दुपारच्या सत्रात उपांत्य फेरीत अहमदनगरचा योगेश पवार आणि विजय आमनेसामने होते. मात्र अटीतटीच्या लढतीत विजयने ७-५ विजय मिळवला. तत्पूर्वी, उपांत्यपूर्व फेरीत योगेशने बीडच्या गोकुळ आवारेला तसेच विजयने अमोल फडतरेला हरवले. तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत अमोल फडतरे गैरहजर राहिला आणि त्यामुळे गोकुळ आवारेला तिसरा क्रमांक मिळाला. मॅट प्रकारातील उपांत्य लढत महेश मोहोळ आणि सचिन येलभर या दोन पुणेकरांमध्ये झाली. मात्र ४-१ अशा फरकाने सचिनने बाजी मारली. त्यापूर्वी झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत महेश मोहोळने ज्ञानेश्वर गोचडेला बाहेरचा रस्ता दाखवला. मात्र दुस-या लढतीत सचिनने अतुल पाटीलवर विजय मिळवला. या लढतीदरम्यान अतुल जखमी झाल्याचा फायदा सचिनला मिळाला.
vijay chaudharyतिस-या दिवशी संध्याकाळच्या सत्रात प्रेक्षकांची मोठी गर्दी वाडिया पार्कमध्ये झाली होती. जवळपास निम्म्याहून अधिक स्टेडियम भरून गेले होते. त्यामुळे किताबाच्या लढतीला आज खूप गर्दी होण्याची शक्यता आहे.

सकाळच्या सत्रात झालेल्या मातींवरील कुस्त्यांमध्ये अहमदनगरच्या योगेश पवारने विजय धुमाळला (उस्मानाबाद) हरवले. अन्य लढतीमध्ये बीडच्या गोकुळ आवारेने जालनाच्या विलास भोईफोडेचा ८-६ असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. जळगावच्या विजय चौधरीने लपेट डावाचा अवलंब करत कोल्हापूरच्या कौस्तुभ डाफळेला बाहेरचा रस्ता दाखवला. पुणे शहराचा समीर पोळेकर आणि साता-याचा अमोल फडतरे यांच्यात चांगली कुस्ती रंगली. मात्र अमोलने बाजी मारताना पुढील फेरी गाठली.
मॅट गटातील उपउपांत्यपूर्व फेरीत सकाळच्या सत्रात पुणे शहराचा महेश मोहोळने कोल्हापूरच्या नंदू आबदारला चीत केले. पहिल्या राउंडमध्ये ५-२ असा महेश आघाडीवर होता. दुस-या राउंडमध्ये नंदूने थोडा प्रतिकार केला. मात्र मोक्याच्याक्षणी तो गाफील राहिल्याने महेशने त्याची पाठ टेकवली. अन्य लढतीमध्ये लातूरच्या ज्ञानेश्वर गोचडेने रायगडच्या अंकुश घरतला हरवले. जळगावच्या अतुल पाटीलने एकेरी पटात पिंपरी चिंचवडच्या अभिषेक फुगेचा पराभव केला. चौथ्या लढतीमध्ये पुणे जिलच्या सचिन येलभरने मुंबई शहरच्या राजेंद्र राजवडेला हरवले.
सुशील कुमार आणि योगेश्वर मुख्य आकर्षण
लंडन ऑलिंपिंकमधील पदकविजेते सुशील कुमार आणि योगेश्वर दत्त या कुस्तीपटूंची रविवारी महाराष्ट्र केसरीला मुख्य उपस्थिती असणार आहे. आयोजक वैभव लांडगे यांनी ही माहिती दिली. सुशील कुमार आणि योगेश्वर दत्त यांच्या उपस्थितीची जाहिरात याआधीच आयोजकांनी केली होती. त्याप्रमाणे हे दोन कुस्तीगीर उपस्थित राहतील. त्याआधी शनिवारी या दोघांनी शिर्डी येथे साईबाबांचे दर्शनही घेतले.

Exit mobile version