Home Featured News केंद्र सरकार मूठभरांसाठीच, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील

केंद्र सरकार मूठभरांसाठीच, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील

0

जालना- देशातील सरकार विकासाच्या नावावर मूठभर उद्योगपतींसाठी निर्णय घेत आहे. देशाच्या संसदेला बाजूला ठेवून मोदींनी ७ अध्यादेश काढले. सत्यशोधक समाजाने याचा जागरूकपणे विचार करावा. जनतेच्या अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य व शिक्षण या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रथम लढा देण्याची गरज आहे. या गरजा पूर्ण झाल्यावर जात-धर्मासाठी लढता येईल, असे मत माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी व्यक्त केले.

जालन्यातील मा. कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात शनिवारी अखिल भारतीय सत्यशोधक समाजाच्या ३७ व्या अधिवेशनाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष प्रा. जी. ए. उगले, तर स्वागताध्यक्ष म्हणून ज्येष्ठ समाजकार्यकर्ते अ‍ॅड. ब्रह्मानंद चव्हाण होते. कोळसे-पाटील म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते म्हणून देशाला चांगली घटना मिळाली. घटनेची सुरुवात करताना अनेक प्रस्ताव आले तरी डॉ. आंबेडकरांनी ह्यआम्ही भारताचे लोक…ह्णअशी सुरुवात केली. प्रत्येक ठिकाणी लढाई आहे. अर्थात, त्या-त्या वेळी त्या-त्या महापुरुषांनी आम्हाला मदत केली. सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात शाळा सुरू केली तेव्हा मुलींना अक्षरश: पोत्यात भरून आणले जायचे. असा संघर्ष महापुरुषांनी वेळोवेळी केला. हा संघर्ष लक्षात घेऊन वाटचाल करावी, असेही कोळसे पाटील म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका
एका न्यूज चॅनलच्या चर्चेत देशातील भ्रष्टाचार कधी जाईल, असा प्रश्न विचारण्यात आला. या वेळी मोदींची इच्छा असल्याचा संदर्भ देण्यात आला. यावर ज्या देशात सामाजिक व आर्थिक विषमता पराकोटीला पोहोचली तेथील भ्रष्टाचार जाणार नाही. निवडणूक काळात नरेंद्र मोदी पाटणा येथे सभा घेऊन जेट विमानाने झोपण्यासाठी अहमदाबादला जात असत. भ्रष्टाचाराशिवाय हे विमान आले काय? तुम्ही पैसे घेत नसाल, तुम्हाला पैसे घेण्याची गरजही नाही. मात्र, सर्वकाही सुरू आहे. सगळ्या उद्योगपतींना देश विकत देऊन जर तुम्ही कायमचे पंतप्रधान म्हणून राहणार असाल तर असा माणूस जगात कुठेच नाही, अशी सडेतोड टीका कोळसे पाटलांनी केली.

सत्यशोधक समाजाची ३ तत्त्वे
दलाल काढा, सावकाराच्या पाशातून शेतकऱ्यांना वाचवा व सुलभ शिक्षण ही महात्मा जोतिबा फुलेंच्या सत्यशोधक समाजाची तत्त्वे होती. यासाठी लढा देण्याची गरज आहे.

पाच लाख किलोमीटर जमीन जाणार
दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठी महामार्ग तयार केला जाणार आहे. यात महामार्गाच्या दुतर्फा असलेली शेतकऱ्यांची ५ लाख किलोमीटर जमीन जाणार आहे. भारतात पक्का माल तयार करून परदेशात निर्यात करायची, हे सर्व मूठभर उद्योगांसाठी सुरू आहे. यातून सामाजिक-आर्थिक विषमता दूर होणार काय, असा प्रश्न कोळसे पाटलांनी केला.

शेतकरी हा केंद्रबिंदू मानून नियोजन
नैसर्गिक दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी सिंचन योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. शेतकरी केंद्रबिंदू मानून राष्ट्रीय नियोजन करण्याची गरज आहे. दरम्यान, परिवर्तनवादी विचारांना मानणाऱ्या व कणखर असलेल्या मतदारांना आतापर्यंत परिवर्तनवादी विचारांचे लोकप्रतिनिधी निवडता आले नाहीत, ही एक शोकांतिका आहे.(साभार डीएम)

Exit mobile version