Home Featured News ..भारतात वाघ वाढले

..भारतात वाघ वाढले

0

नवी दिल्ली, दि. २० – भारतात गेल्या चार वर्षांमध्ये वाघांची संख्या तब्बल ३० टक्क्यांनी वाढल्याची दिलासादायक माहिती समोर आली आहे. २०१० मध्ये भारतात १,७०६ वाघ होते. तर २०१४ मध्ये भारतातील वाघांची संख्या २,२२६ वर पोहोचली आहे.
जगभरात वाघांची संख्या घटत असताना भारतात वाघांची संख्या वाढली आहे. सोमवारी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडकेर यांनी व्याघ्रगणनेसंदर्भात अहवाल प्रकाशित केला. गेल्या चार वर्षांत ३० टक्क्यांनी भारतात वाघ वाढल्याची माहिती जावडेकर यांनी दिली. वाघांची संख्या वाढणे हे भारतासाठी सुचिन्ह असल्याचे त्यांनी नमूद केले. जगभरातील एकूण वाघांपैकी ७० टक्के वाघ हे भारतात आढळतात असा दावाही त्यांनी याप्रसंगी केला. भारतातील १८ राज्यांमध्ये सुमारे ३ लाख ७८ हजार चौ. किमी ऐवढ्या वनक्षेत्रात व्याघ्रगणना पार पडली. या गणनेत वाघाच्या १,५४० दुर्मिळ छायाचित्रही सीसीटीव्ही कॅमे-याद्वारे टिपण्यात आले. कर्नाटक, उत्तराखंड, मध्यप्रदेश, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये वाघांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

Exit mobile version