महाज्योतीच्या बैठकीला मुहूर्त सापडेना;पीएचडीचे विद्यार्थी अधिछात्रवृत्तीच्या प्रतीक्षेत

0
20

नागपूर : महाज्योतीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांना बैठकीसाठी वेळ मिळत नसल्याने पीएचडीसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती (फेलोशिप)साठी प्रतीक्षा करावी लागत आहे. विशेष म्हणजे, पीएचडीसाठी २०१७ मध्ये नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची प्रबंध जमा करण्याची वेळ आली तरी त्यांना महाज्योतीची अधिछात्रवृत्ती मिळालेली नाही.

महाज्योतीच्या अध्यक्षपदी मंत्री विजय वडेट्टीवार आणि व्यवस्थापकीय संचालकपदी प्रदीप डांगे आहेत. मंत्रिपदाचा भार आणि अत्यंत व्यस्त कार्यक्रमाामुळे वडेट्टीवार हे महाज्योतीच्या बैठकीला वेळ देऊ शकत नाही, तर गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डांगे यांच्याकडेदेखील इतर कामांतील व्यस्ततेमुळे महाज्योतीसाठी वेळ नाही.

गेल्या वर्षभरात महाज्योतीच्या केवळ तीन बैठका झाल्या. शासनाने मागील आर्थिक वर्षांत महाज्योतीच्या योजनांवरील खर्चाची सीमा १५५ कोटी रुपयांपर्यंत केली. तरीही केवळ साडेतीन कोटी रुपये खर्च करण्यात आले. इतर मंजूर निधीचा विनियोग न केल्यामुळे तब्बल १२५ कोटींचा निधी परत गेला. महाज्योतीची बैठक दरमहा होणे अपेक्षित आहे. परंतु व्यवस्थापकीय संचालक पाच ते सहा महिन्यांच्या अंतराने बैठक घेतात. त्यामुळे योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही. दरम्यान, चालू महिन्यात सलग तीन बैठका पुढे ढकलण्याची वेळ आली. त्यामुळे पीएचडी करणारे विद्यार्थी वर्षभरापासून अधिछात्रवृत्तीची प्रतीक्षा करीत आहेत, पण त्यांच्या हातात अद्याप एक दमडीही पडलेली नाही.

शेवटी पीएचडी विद्यार्थ्यांची यादी अंतिम करून, त्यांना फेलोशिप अ‍ॅवार्ड करण्यासाठी प्रथम ९ ऑगस्टची मीटिंग नोटीस निघाली. नंतर ही १६ ऑगस्टला घेण्याचे ठरले. त्या दिवशी महाज्योतीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बैठकीला गैरहजर राहिले. त्यानंतर २१ ऑगस्टची वेळ देण्यात आली, पण आदल्या दिवशीच ही बैठकही रद्द करण्यात आली. आता २८ ऑगस्टला बैठक घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

१ जानेवारी २०२१ पासून छात्रवृत्ती द्या

ज्या दिवशी विद्यापीठात पीएचडीसाठी नोंदणी होते त्या तारखेपासून बार्टी संस्था अधिछात्रवृत्ती देते. महाज्योतीने किमान १ जानेवारी २०२१ पासून छात्रवृत्ती द्यावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. सोबत नियमित विद्यार्थी आणि नोकरी, व्यवसाय करून पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देण्याबाबतही संचालक मंडळाने तातडीने धोरण निश्चित करणे आवश्यक आहे, असे विद्यार्थी संघटनांचे म्हणणे आहे.

मागच्या बैठकीला मंत्री, व्यवस्थापकीय संचालक गैरहजर होते. त्यांच्या अनुपस्थितीत आम्ही बैठक घेतली, परंतु आर्थिक बाबींवर निर्णयासाठी अध्यक्ष लागतो. डांगे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार आहे. त्यांना बदलण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. – लक्ष्मण वडले, संचालक, महाज्योती