चिखलीचे वीर सुपुत्र अनंतात विलीन !

0
120

– हजारोंच्या उपस्थितीत अखेरचा निरोप
चिखली-लुधीयाना येथे कर्तव्यावर असताना परेडदरम्यान निधन झालेल्या चिखलीचे वीर सुपुत्र श्याम प्रकाश शिंदे यांना 9 सप्टेंबर ला रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास हजारो लोकांच्या उपस्थितीत अखरेचा निरोप देण्यात आला. स्थानिक जुने गाव परिसरातील अंधारा महादेव मंदिर परिसरातील शहीद जवान श्याम प्रकाश शिंदे लुधीयाना येथे ते कार्यरत होते होते. 7 सप्टेंबरला सकाळी 6 वाजेच्या सुमारास अकस्मातपणे चक्कर येवून ते खाली कोसळले व त्यांतच त्यांचा प्राणज्योत मालवली.
दरम्यान लष्करी औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर शहीद श्याम शिंदे यांचे पार्थिव सप्टेंबरला सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास चिखली येथे आणण्यात आले. चिखली येथे त्यांचे पार्थिव आल्यानंतर जुनेगाव मित्रमंडळाच्यावतीने स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात पासून जयस्तंभ चौक, सिमेंट रोड, बैल जोडी, चिंच परिसर, जुने गाव, देशमुख गल्ली येथून त्यांच्या निवासस्थानापर्यंत अत्यंयात्रा काढून त्यांचे पार्थिव प्रथम त्यांच्या घरी नेण्यात आले. याठिकाणी शहीद शिंदे यांच्या पत्नी स्वाती श्याम शिंदे, आई कावेरीबाई आणि अवघ्या 11 वर्षांचा अनिरूध्द व 6 वर्षांचा देवांश ही दोन मुलं, यांनी टाहो फोडताच उपस्थित कुटूंबीय, आप्त-स्वकीय आणि मित्रपरिवाराचा शोक अनावर झाला होता. त्यानंतर अग्निविधीसाठी जुनेगाव स्मशानभूमी येथे त्यांचे पार्थिक अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले.
याठिकाणी माजी आमदार राहुल बोंद्रे, नगराध्यक्षा प्रिया व कुणाल बोंद्रे, उपाध्यक्षा वजीराबी व शे.अनिस, प.सं.सभापती सिंधू तायडे, आमदार श्वेता महाले यांच्यावतीने अंकुशराव पडघान, प्रा.नरेंद्र खेडेकर, मनसे जिल्हाध्यक्ष मदनराजे गायकवाड, रामदास देव्हडे, नगरसेवक पंडितराव देशमुख, सुदर्शन खरात, गोविंद देव्हडे, गोपाल देव्हडे, नामु गुरूदासाणी, संजय अतार, सुदर्शन भालेराव आदी लोकप्रतिनिधींसह प्रशासनाच्यावतीने उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे, तहसीलदार अजितकुमार येळे, ठाणेदार अशोक लांडे, मुख्याधिकारी सुरडकर आदींनी पुष्पचक्र वाहून शहीद श्याम शिंदे यांना श्रद्धांजली वाहिली.
दरम्यान पोलीस दलातर्फे हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. शहीद शिंदे यांचे मोठे बंधू अनंथा शिंदे यांनी पार्थिवाला अग्नी दिला. सर्व उपस्थितांनी वीर हुतात्म्याला वंदन केले. यावेळी सर्वच क्षेत्रातील मान्यवरांसह शहर व परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते. अंत्ययात्रेदरम्यान रस्त्याच्या दुतर्फा भारतमातेच्या या सुपुत्राला वंदन करण्यासाठीही नागरीकांची मोठी उपस्थिती होती. ठिकठिकाणी श्रद्धांजलीपर फलक लावण्यात आले होते. ’भारतमाता की जय’, ’शहीद श्याम शिंदे अमर रहे’ अशा गगणभेदी घोषणांत चिखलीचे वीर सुपुत्र श्याम शिंदे अनंतात विलीन झाले.