Home महाराष्ट्र चैत्यभूमीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

चैत्यभूमीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

0

मुंबई, दि. 14: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त आज चैत्यभूमी स्मारक येथे मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांनी विनम्र अभिवादन केले.  यावेळी बुद्धवंदना घेण्यात आली. तसेच चैत्यभूमीवरील भीमज्योतीस पुष्प अर्पण करण्यात आले.

यावेळी भदन्त धम्मप्रिय यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, खासदार राहुल शेवाळे, अतिरिक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, मुंबई महापालिकेचे सहआयुक्त किरण दिघावकर, परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे व इतर मान्यवरांनीही डॉ. आंबेडकर यांना अभिवादन केले.

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीचे मराठी व इंग्रजी कॉफी टेबल बुक प्रदर्शन व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शन दालनास मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी भेट दिली. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेले स्मृतिचिन्ह मान्यवरांना भेट म्हणून देण्यात आले.या कार्यक्रमाचे निवेदन चारुशीला शिनई यांनी केले. कार्यक्रमाचे व्यवस्थापन नागसेन कांबळे, चैत्यभूमी व्यवस्थापक प्रदीप कांबळे, अध्यक्ष सुनील बनसोडे यांनी पाहिले.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

मुंबई, दि. 14 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज विधान भवनातील त्यांच्या पुतळ्यास विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे उप सचिव राजेश तारवी, अवर सचिव रविंद्र जगदाळे, वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक तथा जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने, विधानपरिषदेच्या उपसभापती यांचे खाजगी सचिव तथा जनसंपर्क अधिकारी रविंद्र खेबुडकर यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

Exit mobile version