Home महाराष्ट्र वनविभागाच्या नूतन कार्यालयाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

वनविभागाच्या नूतन कार्यालयाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

0

कोल्हापूर, दि. 22: वन विभागाच्या अत्यंत देखण्या आणि आकर्षक अशा नवीन वास्तूचे उद्घाटन तसेच जंगल सफारीसाठी नवीन वातानुकुलित असणारी बस आणि २ नवीन कॅम्पर बोलेरो गाड्या यांचे लोकार्पण पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते विचारे माळ, सदर बाजार येथे संपन्न झाले. यावेळी आमदार श्रीमती जयश्री जाधव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) विशाल माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
राधानगरी धरण आणि दाजीपूर अभयारण्य यांनी कोल्हापूरच्या पर्यटनाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. कोल्हापुरातील व्यवसाय चालण्यासाठी पर्यटन अधिक प्रगतीशील होणे गरजेचे आहे हे ओळखून वन विभागाच्या वतीने पर्यटकांसाठी जंगल सफारीसाठी नवीन वातानुकुलित असणारी बस आणि २ नवीन कॅम्पर बोलेरो गाड्या घेण्यात आल्या असून त्याव्दारे पर्यटकांची पर्यटनाची सोय करण्यात येणार आहे. वन विभागाच्या या अभिनव उपक्रमाचे पालकमंत्र्यांनी कौतुक करुन सागरेश्वरच्या वनक्षेत्रपाल (वन्यजीव) श्रीमती पल्लवी चव्हाण यांनी तयार केलेल्या घडीपुस्तिकेचे प्रकाशन केले.
कोल्हापूरहून निघणाऱ्या या जंगल सफारीमध्ये राधानगरी धरण, देवराई ,दाजीपूर जंगल सफारी, राऊतवाडी धबधबा आणि बरीच ठिकाणे पर्यटकांना यामध्ये पाहता येतील. यासोबत पर्यटकांसाठी केवळ 400 रुपयांमध्ये चहा व नाश्ताची सोय करण्यात येणार आहे. यावेळी विभागीय वन अधिकारी (सामाजिक वनीकरण) एम.बी.चंदनशिवे, वनसंरक्षक (वन्यजीव) नानासाहेब लडकत, राजेश लाटकर यांच्यासह वनविभागाचे इतर कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version