जिल्ह्यातील एकही गाव जलसिंचनापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री जयंत पाटील

0
14

– ‘आपले सरकार’ ही भावना निर्माण करण्यात राज्य शासन यशस्वी

– जिल्ह्याच्या सर्वांगीण ‍विकासाला सर्वतोपरी प्राधान्य

– शिक्षण, आरोग्य, नागरी सुविधांच्या गुणवत्ता वाढीवर भर

– सामाजिक एकोपा जपण्याचे आवाहन

सांगली, दि. 1, (जि. मा. का.) : कोरोना महामारी, नैसर्गीक आपत्ती सारखे संकट झेलत महाराष्ट्र स्वाभिमानाने, कणखरपणे मार्ग काढत आहे. शासनाने गेल्या दोन अडीच वर्षात राज्याच्या विकासाच्या दृष्टीने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. संकटाची मालिका सुरू असतानाही सर्व आघाड्यांवर लढण्यात, सर्वसामान्य माणसांना दिलासा देण्यात शासनाला यश आले आहे. हे सरकार ‘आपले सरकार’ असल्याची भावना निर्माण करण्यात राज्य शासन यशस्वी झाले आहे, असे सांगून जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगली जिल्हा हा कृषि प्रधान जिल्हा आहे, त्यामुळे जिल्ह्यातील कोणतेही गाव जलसिंचनापासून  वंचित राहू नये यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहे.  जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला सर्वतोपरी प्राधान्य दिले असून शिक्षण, आरोग्य, नागरी सुविधांच्या गुणवत्ता वाढीवर भर दिल्याचे प्रतिपादन केले. यावेळी त्यांनी प्रत्येकाने आपली सद्सदविवेक बुध्दी जागृत ठेवून सामाजिक एकोपा प्राणपणाने जपावा, असे कळकळीचे आवाहन केले.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६२ व्या वर्धापन दिनी मुख्य शासकीय समारंभात पोलिस परेड ग्राऊंड सांगली येथे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सकाळी ठीक 8 वाजता पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रगीताने राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांनी महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या जिल्हावासियांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा डुबुले, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे,  आदि मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, महाराष्ट्राने समाज जीवनाच्या सर्वच क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केली आहे. कृषि, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण, संशोधन, साहित्य, नाटक, चित्रपट, कला, संस्कृती अशा सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. देशातील प्रगतशील आणि पुरोगामी राज्य म्हणून आज महाराष्ट्राचा लौकिक आहे. गेल्या   दोन  अडीच  वर्षाच्या  काळात   कृषि, उद्योग, वने,  आरोग्य, जलसंपदा आदि विभागांतर्गत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. ज्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम झाला आहे.

गोरगरीब सर्वसामान्यांच्या मुलांना सरकारी शाळांमधून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी या क्षेत्रात जिल्ह्यात आपण अमुलाग्र बदल घडवत आहोत. त्यासाठी  जिल्हा परिषदेच्या शाळांमधून मॉडेल स्कूल अभियान राबविण्यात येत आहे असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, माझी शाळा आदर्श शाळा हा महत्वाकांक्षी व नाविण्यपूर्ण उपक्रम जिल्ह्यातील 176 शाळांमधून यशस्वीपणे राबविला आहे. सन 2022-23 मध्येही 156 ‍जिल्हा परिषद शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 11 जिल्हा परिषद शाळांमध्ये सायन्स पार्क निर्मिती करण्यासाठी भरीव निधी आपण दिला आहे. अनेक वैविध्यपूर्ण उपक्रम, शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा यामुळे जिल्हा परिषदेंच्या शाळांचा  कायापालट  होत  आहे.  त्यामुळे जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढली आहे. महाराष्ट्र लोकसेवा अधिनियमांतर्गत 35 सेवा विद्यार्थ्यांसाठी तर 70 सेवा शिक्षकांसाठी 1 मे 2022 पासून सुरू होत  आहेत.

पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, प्रतिवर्षी बसणाऱ्या महापूराचा तडाखा लक्षात घेता आपत्ती निवारण यंत्रणा बळकट करण्यावर भर दिला आहे. त्यामुळेच 2021 चा महापूर आला तरी महाप्रलय टाळण्यात आपल्याला यश आले आहे. पाटबंधारे विभागामार्फत पूरसंरक्षक भिंत बांधकाम, पूररेषा निश्चितीकरणाची कामे, विशेष दुरूस्तीची कामे करण्यात येत आहेत. कोणतेही गाव जलसिंचनापासून वंचित राहू नये यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत आहोत. खानापूर, आटपाडी, तासगाव, जत येथे टेंभूचे क्षेत्र वाढविण्याला आपण प्राधान्य दिले आहे.

सन 2021-22 मध्ये सांगली जिल्ह्यातील मोठे प्रकल्प, मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प, उपसा सिंचन योजना व कृष्णा नदीवरील क्षेत्र असे एकूण 2 लाख 64 हजार हेक्टर सिंचित क्षेत्र आहे. टेंभू, ताकारी, म्हैसाळ या योजनांमधून एकूण 33 हजार हेक्टर क्षेत्र उपसा सिंचन योजनांद्वारे भिजविण्यात येत असून सद्य:स्थितीत आवर्तने चालू आहेत. या तीन उपसा सिंचन योजनांचा संकल्पीत वार्षिक पाणी वापर सुमारे 48 टीएमसी असून सद्य:स्थितीत वार्षिक 30 ते 35  टीएमसी  पाणी अनेक टप्प्यांद्वारे उचलून अवर्षण भागातील शेतीसाठी सिंचन सुविधा पुरविण्यात येते. तसेच प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील लहान/मोठे तलाव पाण्याने भरुन दिले जात आहेत. त्यामुळे या भागांतील नागरिकांना व पशुधनास टंचाई कालावधीत टंचाई निवारणार्थ फार मोठी मदत झाल्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.

पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, सन 2021-22 मध्ये या एका वर्षात टेंभू योजनेद्वारे 10 हजार 627 हेक्टर, ताकारी व म्हैसाळ योजनेद्वारे 4 हजार 557 हेक्टर इतकी सिंचन क्षमता निमार्ण झालेली आहे. कृष्णा-कोयना उपसा सिंचन योजनांच्या लाभक्षेत्राबाहेरील परंतु लाभक्षेत्रालगतच्या गावांना सिंचनाचा लाभ देण्याच्या दृष्टीने या प्रकल्पांस 6 टीएमसी अतिरिक्त पाणी उपलब्ध करण्यात आले असून त्याद्वारे अवर्षण प्रवण भागातील काही वंचित गावांना सिंचनाचा लाभ देण्याच्या दृष्टीने कार्यवाही प्रगतीत आहे. उजनी, वारणा प्रकल्पाच्या पाणी वापराचे फेर नियोजन केल्यामुळे आवर्षण ग्रस्त सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांना लाभ होणार आहे. 57 हजार 475 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. सध्या सुरू असलेल्या उपसा सिंचन योजनेचे विद्युत देयके मोठ्या रक्कमेची येत असल्याने या योजना किफायतशिरपणे चालु राहण्यासाठी या योजना सौर उर्जावर चालवण्याचे नियोजन केले आहे.जलसंपदा विभागातील 14 हजार रिक्त जागा येत्या तीन वर्षात टप्याटप्याने भरल्या जातील.

क्षारपड जमिनीचा प्रश्न सोडविण्यासाठी जलसंपदा विभागाच्या माध्यमातून भूमीगत चर योजना तयार करण्यात आल्याचे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले,  या अंतर्गत जिल्ह्यातील कवठेपिराण, उरण इस्लामपूर, आष्टा, कसबे डिग्रज व बोरगाव या गावांतील क्षारपड जमीन विकासासाठी 93 कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीपैकी 80 टक्के निधी शासन व 20 टक्के निधी शेतकऱ्यांनी द्यावयाचा आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत  द्राक्ष,  केळी,  ड्रॅगनफ्रुट,  ॲव्होकॅडो  या   पिकांचा  समावेश  केला असून या योजनांचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा.

महापालिका क्षेत्रातील नागरिकांनाही दर्जेदार सुविधा ‍मिळाव्यात यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले असल्याचे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, कुपवाड़ वारणाली येथे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कम्युनिटी हेल्थ सेंटर हे हॉस्पिटल जनतेच्या आरोग्याच्यादृष्टीने लवकरच सुरु करण्यात येत आहे. जनतेच्या सहभागातून विविध ठिकाणी चौक सुशोभिकरण व मनपाच्या खुल्या जागा विकसित करण्यात आलेल्या आहेत.  प्रथमच प्लास्टिकचा वापर केल्यामुळे रस्ते टिकाऊ झाले असून रस्त्यांचे आयुष्यमान वाढणार आहे.  कुपवाड  ड्रेनेज  योजनेला  मान्यता  मिळालेली असून लवकरच या कामाला सुरवात होणार आहे. त्यामुळे कुपवाड शहराचा ड्रेनेजचा प्रश्न सुटणार आहे. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका व जीवन ज्योत कॅन्सर रिलीफ ॲन्ड केअर ट्रस्ट सांगली  यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली येथे अद्ययावत असे कॅन्सर सेंटर उभारण्यात येणार आहे. अल्पदरात सर्व नागरिकांना वैद्यकिय सुविधा मिळणार आहेत.

विकासाची फळे समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचली पाहिजेत यासाठी  महाविकास आघाडी शासन अत्यंत दक्ष आहे. सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून  दोन वर्षाच्या काळात विविध वैयक्तिक व सामुहिक लाभाच्या योजनांमध्ये अनेक सकारात्मक बदल केले आहेत. त्यामुळे लाभार्थींची संख्याही वाढली असल्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.

गुणवंतांचा पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते सत्कार

यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये जिल्हा उद्योग पुरस्कारासाठी निवड झालेल्या इस्लामपूर येथील मे. व्यास एंटरप्रायजेसच्या मालक योगिता माळी, कुंडल येथील मे. राजनिलक इंडस्टीज चे मालक सचिन लाड यांचा अनुक्रम प्रथम पुरस्कारासाठी 15 हजार रूपये व वदितीय पुरस्कारासाठी 10 हजार रूपये, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला.

जिल्हा पुरवठा कार्यालये, तहसिल कार्यालय पुरवठा शाखा, अन्न धान्य वितरण अधिकारी कार्यालय, परिमंडळ कार्यालय, विभागातील सर्व गोदामे व सर्व रास्त भाव दुकाने आयएसओ मानांकन मध्ये उत्कृष्ट काम केलेल्या पुरवठा विभाग तहसिल कार्यालय वाळवा, खानापूर कडेगाव गोदामपाल सिधू शिंदे, रावळी येथील रास्त भाव दुकानदार दौलत माळी यांचा सत्कार करण्यात आला.

महानगरपालिकेच्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत स्वच्छ टेक्नॉलॉजी चॅलेंज कॉम्पीटीशनचे विजेते प्रथम क्रमांक प्राप्त क्रेडॉस इन्फा प्रा. लि., व्दितीय क्रमांक वेस्ट कार्ट, तृतीय क्रमांक स्पंदन प्रतिष्ठान, चतुर्थ आण्णासाहेब डांगे कॉलेज व पंचम क्रमांक प्राप्त आय स्मार्ट टेक्नो सोल्युशन, स्मार्ट पी.एच.सी. उपक्रमासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, माझी शाळा आदर्श शाळा उपक्रमाबद्दल शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड  यांचा गौरव करण्यात आला.

पोलिस विभागात उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलिस निरीक्षक अजित सिद, सहायक पोलिस फौजदार संजय सनदी, पोलिस हवलदार अभिजीत धनगर, खडतर सेवेबद्दल पोलिस उपनिरीक्षक रोहिदास पवार, उत्कृष्ट गुन्ह्याची उकल केल्याबद्दल सहायक पोलिस ‍निरीक्षक रविराज फडणीस, पोलिस ‍निरीक्षक  शिवाजी गायकवाड, पोलिस हवलदार श्री. ढेंबरे, पोलिस नाईक श्री. पाटील,  शिपाई श्री.  निळे, सहायक पोलीस फौजदार सुभाष पाटील, पोलिस हवलदार संदीप मोरे, रमेश कोळी, कपील साळुंखे, पोलिस नाईक सचिन मोरे, सहायक पोलिस निरीक्षक अमितकुमार पाटील, सहायक पोलिस फौजदार अनिल एैनापुरे, पोलिस नाईक दऱ्याप्पा बंडगर,  सर्वोत्कृष्ट अपराधसिध्दीसाठी सहायक पोलिस निरीक्षक अमितकुमार पाटील, पोलिस हवलदार एस. व्ही. कोळी, पोलिस नाईक के.के. कांबळे, पोलिस शिपाई इम्रान महालकरी, पोलिस निरीखक राजेश घरे, सहायक पोलिस निरीक्षक एम. जे. मोहिते, पोलिस हवलदार एस. इनामदार, पोलिस नाईक यु. एस. फकीर, पोलिस निरीक्षक संजीव कुमार, पोलिस नाईक एस. एस. पवार, पोलिस हवलदार आर. व्ही. माळकर, पोलिस नाईक व्ही. एस. मोहिते, पोलिस शिपाई एच. टी. गवळेी, पोलिस नाईक एस. जी. चिल्हावार, सहायक पोलिस फौजदार जी. एस. झांझरे, सी. टी. कांबळे  यांचा गौरव करण्यात आला.

प्रारंभी ध्वजरोहणानंतर पालकमंत्री जयंत पाटील यांनी परेड निरीक्षण केले. परेड संचलनात पोलीस, होमगार्ड, अग्निशमन दल, एनसीसी, बँड, वज्र वाहन, श्वान, निर्भया, डायल 112, फौंरेन्सीक लॅब, बीडीडीएस, आरसीपी पथक, आरोपी पार्टी वाहन, सिव्हील हॉस्पीटल रूग्णवाहिका आदि पथकांचा समावेश होता. त्याचबरोबर आरोग्य विभाग, सामाजिक न्याय, माझी वसुंधरा, मॉडेल स्कूल, पत्रकार दिपक चव्हाण यांचा शोले स्टाईल आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत देशभक्तीपर गाण्यांचा चित्ररथ आदि चित्ररथांचा सहभाग होता.

यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते महिला सुरक्षितता पथदर्शी प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला.

या समारंभास स्वातंत्र्य सैनिक, अनेक मान्यवर पदाधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन विजयदादा कडणे आणि पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब माळी यांनी केले.