Home महाराष्ट्र लोकराजाला आदरांजली वाहण्याचा संदेश प्रत्येकांपर्यंत पोहोचवा – पालकमंत्री सतेज पाटील यांचे आवाहन

लोकराजाला आदरांजली वाहण्याचा संदेश प्रत्येकांपर्यंत पोहोचवा – पालकमंत्री सतेज पाटील यांचे आवाहन

0

कोल्हापूर दि. 6 : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त 18 एप्रिल पासून जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. 6 मे 2022 रोजी स्मृती शताब्दी पर्वात राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करण्याचा मुख्य कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाच्या पूर्व तयारीचा सविस्तर आढावा पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज शाहू मिल येथे घेतला.

या प्रसंगी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, महापालिकेच्या आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर आणि आदित्य बेडेकर, प्रमोद पाटील, ऋषीकेश केसकर, प्रा. महादेव नरके, उदय गायकवाड, सुखदेव गिरी, प्रसन्न मालेकर, जयदीप मोरे, अमरजा निंबाळकर यांच्यासह संबंधित अधिकारी, कृतज्ञता पर्व समिती सदस्य उपस्थित होते.

6 मे रोजी सकाळी 10 वाजता 100 सेकंद स्तब्धता पाळून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व संस्था, संघटना, मान्यवर व्यक्ती, पदाधिकारी, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी आणि जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन जेथे असाल तेथे 100 सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करुया.
अभिवादन कार्यक्रमाची व्यापक जनजागृती करा. यामध्ये प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमाबरोबरच एफएम रेडिओ चॅनल, स्थानिक केबल वाहिन्या व महापालिकेच्या घंटागाड्यावरुनही नागरिकांपर्यंत संदेश पोहोचवा, असे पालकमंत्री श्री पाटील यांनी सांगितले. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जिल्हा परिषदेने जनजागृती करावी. जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीने या अभिवादन कार्यक्रमात सहभागी होऊन आपल्या लोकराजाला आदरांजली अर्पण करावी, असे आवाहन पालकमंत्री श्री. पाटील यांनी केले.

राजर्षी शाहू महाराज समाधी स्थळास पालकमंत्र्यांची भेट

पालकमंत्री श्री. पाटील यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळास भेट देवून 6 मे रोजी सकाळी 10 वाजता राजर्षी शाहू महाराज समाधी स्थळ येथे होणाऱ्या अभिवादन कार्यक्रमाची माहिती घेतली. या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. अभिवादन कार्यक्रमासाठी मान्यवर व्यक्ती, पत्रकार, नागरिक यांच्या उपस्थितीबाबत माहिती घेऊन त्याप्रमाणे सुयोग्य नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. पाटील यांनी दिल्या.

error: Content is protected !!
Exit mobile version