सहायक आयुक्त मोरे पुन्हा गुन्हेशाखेत;175 शहर पोलीसांच्याही बदल्या

0
25

नाशिक :- नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या शहर गुन्हेशाखेच्या सहायक आयुक्त पदाचा कार्यभार पुन्हा वसंत मोरे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. महिनाभरापूर्वीच याच पदावर असताना मोरे यांची पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी तडकाफडकी अर्ध्यारात्री शहर गुन्हेशाखेतून नियंत्रण कक्षात बदली केली होतीया घटनेमुळे शहर पोलिसांमध्ये उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून रखडलेल्या आयुक्तालयांतर्गत १७५ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मात्र यातून विनंत्या बदल्या प्रलंबित ठेवण्यात आल्या आहेत.

👉🟪👉गेल्या महिन्यात शहर गुन्हेशाखेचे सहायक पोलीस आयुक्त वसंत मोरे यांची पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली केली होती. पोलीस अधिकाऱ्यांच्या तक्रारीसह काही बाबींचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. तसेच, त्याचवेळी २० पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात असलेल्या तक्रारींची दखल घेत त्यांच्यावरही अशाप्रकारे कारवाई करण्यात आलेली होती.या घटनेला महिना उलटत नाही, तोच नियंत्रण कक्षात हजर झालेले सहायक पोलीस आयुक्त वसंत मोरे यांची पुन्हा शहर गुन्हेशाखेच्या सहायक आयुक्त पदाची जबाबदारी पुन्हा सोपविण्यात आली आहे. शहर गुन्हेशाखेचे पोलीस उपायुक्त संजय बारकुंड यांच्या पदोन्नतीने धुळे येथे पोलीस अधीक्षकपदी बदली होताच सहायक आयुक्त मोरे यांच्याकडे पुन्हा शहर गुन्हेशाखेची जबाबदारी दिल्याने हा योगायोग समजावा की आणखी काही, याबाबत शहर पोलीस वर्तुळात मात्र चर्चा रंगली आहे.

👉🔴👉१७५ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या रखडल्या होत्या. पाच वा त्यापेक्षा जास्त वर्षे एकाच ठिकाणी कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या आयुक्तालय हद्दीत बदल्या केल्या जातात.त्यानुसार, आयुक्त नाईकनवरे यांनी १७५ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. मात्र, त्याचवेळी आयुक्तांनी विनंती अर्ज केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या केलेल्या नाहीत. तर, अनेकांना अपेक्षित बदलीचे ठिकाण न मिळाल्याने ते सोयीच्या ठिकाणी बदली व्हावी यासाठी विशेष प्रयत्न करीत आहेत.