Home महाराष्ट्र दिव्यांगांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे आवाहन

दिव्यांगांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे आवाहन

0

नंदुरबार, दि.4: केंद्र व राज्य पुरस्कृत दिव्यांग योजनांचा सर्व दिव्यांगांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  डॉ.विजयकुमार गावीत यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभाग, मनुदेवी फाउन्डेशन, नंदुरबार संचलित दुधाळे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र  यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिनाच्या औचित्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.सुप्रियाताई गावित, खासदार डॉ.हिनाताई गावित, जिल्हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, समाज कल्याण सभापती शंकर पाडवी, महिला व बालकल्याण सभापती संगीता गावित, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, जिल्हा समाज कल्याण अधिकारी देविदास नांदगावकर, माजी विभागीय समाज कल्याण अधिकारी जितेंद्र वळवी, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या अध्यक्षा ज्योती चौधरी, समन्वयक राजेश चौधरी, ॲड. जयश्री वळवी आदी  उपस्थित होते.

यावेळी मंत्री डॉ.गावित म्हणाले, दिव्यांग समाजातील दुर्लक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र व राज्य शासन प्रयत्न करत असून शासनामार्फत दिव्यांगासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. परंतु अद्यापही या योजनांचा लाभ घेण्याचे प्रमाण अत्यंत कमी प्रमाणात आहे हया योजना अधिकाधिक तळागाळापर्यंत पोहचण्यासाठी जनजागृतीची मोहिम राबवावी. जी दिव्यांग लहानमुले बोलत नसतील अशा मुलांवर पालकांनी वेळीच दवाखान्यात जाऊन उपचार करावे, जेणे करुन त्यांच्यावर उपचार करुन ते बोलू शकतील. जिल्ह्यातील दिव्यांगांना विविध योजनेचा लाभ देण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी कॅम्प आयोजित करावेत त्यामुळे त्यांना केंद्र सरकार व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ देता येईल.  दिव्यांग क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या संस्था व व्यक्तींना प्रोत्साहन म्हणून शासनामार्फत विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असल्याने अशा पुरस्कारांचाही लाभ घ्यावा. दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना अनुदान मिळण्यासाठी राज्यस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल. जेणे करुन या संस्था चांगल्या चांगल्या सोईसुविधा उपलब्ध करुन देवू शकतील. दिव्यांग नागरिकांना विविध कल्याणकारी योजनेचा लाभ  देण्यासाठी आज पासून स्वतंत्र दिव्याग कल्याण विभाग  स्‍थापन करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी ज्या दिव्यांग व्यक्तींना युडीआयडी कार्ड काढले नाही, अशा दिव्यांगांनी युडीआयडी कार्ड काढण्याचे आवाहनही केले.

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दिव्यांगाना घरकुले : जि.प.अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित

जि.प.अध्यक्षा डॉ.गावित म्हणाल्या की, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दिव्यांगाना घरकुल मंजूर केले असून लवकरच त्यांना घरकुल योजनेचे आदेश वितरीत करण्यात येईल. जिल्हा परिषदेच्या निधीतून  दिव्यांग व्यक्तींना वेगवेगळ्या शस्रक्रियांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. जिल्हा परिषदेमध्ये बंद पडलेल्या लिफ्टमूळे येथे येणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना  खुप त्रास होतो यासाठी पालकमंत्री महोदयांकडे लिफ्ट दुररुस्तीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांनी यावेळी पालकमंत्री महोदयांचे आभार मानले.

जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांगाला शासकीय योजनेत सामावण्यासाठी शिबिरांचे आयोजन करणार : खासदार डॉ. हिना गावित

केंद्र सरकारच्या समाज कल्याण विभागामार्फत वेगवेगळया प्रकारचे दिव्यांगत्व आलेल्या नागरिकांसाठी कृत्रिम अवयव, हेअरींग रिंग, सायकल, इलेक्ट्रीक सायकल यासारख्या उपयोगी वस्तू देण्यात येतात. जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांगाला या योजनांचा लाभ देण्यासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रावर दिव्यांगाची तपासणी करण्यासाठी शिबिरे आयोजित करण्यात  येतील. शासनाच्या नियमानुसार 80 टक्क्यांच्यावर अपंगत्व असलेल्या  दिव्यांग व्यक्तींना इलेक्ट्रीक गाडी देण्यात येते. पंरतु जिल्ह्यात 70 ते 80 टक्क्यांपर्यंत अपंगत्व असलेल्यांयाची संख्या जास्त असल्यामुळे अशा दिव्यांग व्यक्तींनाही सामाजिक उत्तरदायित्व निधीतून इलेक्ट्रीक गाडी देण्यात येईल, असेही यावेळी खासदार डॉ. गावित यांनी सांगितले.

यावेळी मान्यवराच्ंया हस्ते दिव्यांगांनी बनविलेल्या हस्तकला वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन, क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन, तसेच 20 लाभार्थ्यांना युडीआयडी कार्ड वाटप करण्यात आले.  तसेच यावेळी मूक बधीर निवासी विद्यालय, वाघोदा व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र ,दुधाळे येथील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादर केले. यावेळी मोठ्या संख्येन विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.

Exit mobile version