कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणी वाढणार:मुलीकडे ‘टीईटी’ प्रमाणपत्र नाही माहिती अधिकारातून बाब समोर

0
23

औरगांबाद(विशेष प्रतिनिधी)- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणी वाढणार असल्याचे दिसून येत आहे. अब्दुल सत्तार यांच्या मुलीच्या टीईटी घोटाळ्याप्रकरणात माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी मिळवलेल्या माहितीत धक्कादायक बाब समोर आल्याचा दावा केला आहे.तर दुसरीकडे गायरान जागेप्रकरणात आधीच विरोधक त्यांच्या राजीनाम्याची मागणी करीत आहेत.

मुलीकडे ‘टीईटी’ प्रमाणपत्र नाही

नितीन यादव म्हणाले की, टीईटी प्रमाणपत्र नसताना अब्दुल सत्तार यांच्या मुलीला सेवेत कायम कसे केले? हिना कौसर यांचे टीईटी प्रमाणपत्र उपलब्ध नसल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे. हिना यांच्या आधार कार्ड, पॅन कार्ड आणि शाळा सोडल्याच्या दाखल्यावर वेगवेगळ्या जन्मतारखा असतांना हा त्यांना सेवेत रुजू करण्यात आल्याचा आरोपही नितीन यादव यांनी केला आहे. तर मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दुसऱ्या कन्येची माहितीच उपलब्ध नसल्याचे संबंधित विभागाचे पत्र नितीन यादव यांना प्राप्त झाले आहे.

नितीन यादव यांनी सांगितले की, शिक्षक भरतीवर राज्य शासनाने रितसर दि.2/5/2012 पासून बंदी घातलेली असताना देखील विद्यमान कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या श्रीमती शेख हिना कौसर अब्दुल सत्तार या मुलीची 16/8/2018 रोजी शिक्षण सेवक म्हणून कायम नेमणूक केली गेली. यावेळी शासनाने ही नेमणूक करत असताना शिक्षण सेवक म्हणून कायम (परमनंट) करण्यासाठी जे टीईटी प्रमाणपत्र बंधनकारक असते. हे अब्दुल सत्तार यांच्या मुलीचे हे प्रमाणपत्र सरकारकडे नाही असे मला कळविल्याचे नितीन यादव यांनी म्हटले आहे. म्हणजेच टीईटी प्रमाणपत्राविना अब्दुल सत्तार यांच्या मुलीची कायम नेमणूक कोणाच्या दबावावरुन केली गेली हे समजणे गरजेचे आहे, असा प्रश्न यादवांनी उपस्थित केला आहे.

नितीन यादव म्हणाले की, त्यांनी शासनास सादर केलेल्या आधार कार्ड, पॅनकार्ड व शाळा सोडल्याच्या दाखल्यावरील जन्म तारखांचा वेगवेगळा उल्लेख आढळून येत आहे. सोबत दुसऱ्या मुलीची माहितीच त्यांच्या कार्यालयात उपलब्ध नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे शासनाची फसवणूक करुन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सांगण्यावरुन तर हा शिक्षक घोटाळा झाला नाही ना याची चौकशी होणे गरजेचे आहे अशी मागणीही नितीन यादव यांनी केली आहे. यामुळे आता मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणी वाढणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.