राज्यातील वीज ग्राहकांना महावितरण कडून चांगलाच शॉक बसण्याची शक्यता

0
15

मुंबई :राज्यातील वीज ग्राहकांना महावितरण कडून चांगलाच शॉक बसण्याची शक्यता आहे. आगामी दोन वर्षांत सुमारे 67 हजार 644 कोटी रुपयांची तूट भरून काढण्यासाठी सुमारे 38 टक्के वीजदरवाढ करण्याची याचिका महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे दाखल केली आहे. जर या याचिकेला मंजुरी मिळाली तर वीजबिलात प्रतियुनिट 2 रुपये 55 पैशांची वाढ होणार असून, दरवाढीच्या प्रमाणात इलेक्ट्रिसिटी ड्युटी रकमेचा अतिरिक्त बोजा ग्राहकांवर पडणार तो वेगळाच आहे. महावितरणने आपल्या याचिकेत ही दरवाढ स्थिर वा मागणी आकार, वीज आकार व वहन आकार या तिन्हीं आकारात वाढ करण्याची मागणी केली. ही मागणी रोखण्यासाठी ग्राहक व संघटनांनी हरकती दाखल करणे आवश्यक आहे.

महावितरण कंपनीकडून करण्यात आलेल्या अशा रेकॉर्डब्रेक दरवाढीची मागणी आयोग स्थापन झाल्यापासून गेल्या 23 वर्षांत प्रथमच करण्यात आलेली आहे. देशात सर्वाधिक दर असूनही इतकी प्रचंड मागणी राज्यातील सर्व वीज ग्राहकांना शॉक देणारी, येऊ घातलेल्या उद्योगांना रोखणारी व असलेल्या उद्योगांना राज्याबाहेर घालविणारी आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने दि. 30 मार्च 2020 रोजी मार्च 2025 अखेरपर्यंतच्या पाच वर्षासाठी बहुवर्षीय वीजदरनिश्चिती आदेश जाहीर केला आहे.

तथापि कायद्यातील तरतुदीनुसार, तिसर्‍या वर्षी या कंपन्यांना फेरआढावा याचिका दाखल करता येते. त्यानुसार महानिर्मिती आणि महापारेषण या दोन कंपन्यांच्या फेरआढावा याचिकांनंतर आता महावितरण कंपनीची याचिका दाखल व प्रसिद्ध झालेली आहे. 30 मार्च 2020 च्या महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार 2022-23 सालासाठी आयोगाने सरासरी वीजदेयक दर 7 रुपये 27 प्रतियुनिट या दरास मान्यता दिलेली आहे. तथापि, इंधन समायोजन आकार गृहीत धरून हा सध्याचा सरासरी देयक दर 7 रुपये 79 पैसे प्रति युनिट दाखविण्यात आला आहे. या इंधन समायोजन आकारामध्ये अदानी पॉवर लि. कंपनीचा वाटा मोठा आहे, याचेही भान ग्राहकांनी ठेवणे आवश्यक आहे.

️सन 2021-22 मध्ये राज्याला लागणार्‍या एकूण वीजेपैकी 18 टक्के वीज अदानी पॉवरकडून सरासरी 7 रुपये 43 पैसे प्रतियुनिट दराने खरेदी केली आहे. यावरून याचे गांभीर्य ग्राहकांनी ध्यानी घ्यावे. महावितरण कंपनीने पुढील दोन वर्षांसाठी 2023-24 मध्ये 8 रुपये 90 पैसे प्रतियुनिट व 2024-25 मध्ये 9 रुपये 92 पैसे प्रतियुनिट याप्रमाणे दरनिश्चितीची मागणी केली आहे. सरासरी वाढ दाखविताना अनुक्रमे 14 टक्के व 11 टक्के दाखविली आहे. ही ग्राहकांच्या डोळ्यांत धूळफेक करणारी आकडेवारी आहे. खरी दरवाढ मागणी सरासरी 2 रुपये 55 पैसे प्रति युनिट म्हणजे 37 टक्के आहे.