Home महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामुळे जत शहराच्या वैभवात भर- पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामुळे जत शहराच्या वैभवात भर- पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

0

सांगली दि. 18:-  जत तालुक्यातील विकास कामांना भरीव निधी देण्यात येत असून जत तालुक्याच्या विकासासाठी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कटिबध्द असल्याची ग्वाही पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज जत येथे बोलताना  दिली.

जत येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार जयंत पाटील होते. यावेळी खासदार संजय पाटील, आमदार विक्रम सावंत, माजी आमदार व पुतळा समितीचे अध्यक्ष विलासराव जगताप, माजी आमदार अजितराव घोरपडे, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, जोत्सनाताईराजे डफळे, पुतळा समिती सदस्यांसह मान्यवर पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, जत तालुक्याने आपणाला भरपूर प्रेम दिले आहे. त्यामुळे जतच्या विकास कामासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. जत तालुक्याच्या विकासासाठी गत सहा महिन्यात भरघोस निधी उपलब्ध करून दिला असून जत तालुक्याला म्हैसाळ योजनेतून पाणी उपलब्ध करून देण्यास राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे. म्हैसाळ योजना सोलारवर चालवण्यात येणार असल्याने वीज खर्चात बचत होणार असल्याचे पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा जत शहराचे वैभव वाढवेल. महाराजांचा हा पुतळा सर्वांचे  स्फुर्तीस्थान होईल आणि या पुतळ्याकडून सर्वांना प्रेरणा मिळेल, असा विश्वास पालकमंत्री डॉ. खाडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

जत तालुक्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे ही सर्वांचीच भावना असून या विकासासाठी जत येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा प्रेरणास्थान असेल,  अशी भावना  कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली. जत येथे पुतळा उभारण्यासाठी पुतळा समितीने चांगले काम केले असल्याचे गौरवोद्गार  त्यांनी काढले.

खासदार संजय पाटील म्हणाले, जत शहरात उभारण्यात आलेल्या हा पुतळा रयतेच्या राजाचा पुतळा आहे. असा रयतेचा राजा पुन्हा होणे नाही, त्यांनी नव स्वराज्य निर्माण केले, त्यांच्या सर्वच नीतीचा अवलंब जगात केला जात असल्याचे सांगून खासदार श्री. पाटील म्हणाले, जत शहरात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सर्वांना प्रेरणा व ऊर्जा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पुतळा समितीचे अध्यक्ष विलासराव जगताप यांनी प्रास्ताविकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा पुतळा लोकवर्गणीतून उभारण्यात आला असून अनेक संकटावर मात करून पुतळा समितीने पुतळा उभारण्याचे शिवधनुष्य पेलले असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे शिल्पकार गजानन सलगर व अभियंता कपिल शिंदे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

Exit mobile version