Home महाराष्ट्र बाळशास्त्री जांभेकरांच्या जनहितकारी पत्रकारितेचा वारसा पुढे न्यावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बाळशास्त्री जांभेकरांच्या जनहितकारी पत्रकारितेचा वारसा पुढे न्यावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

सिंधुदुर्गनगरी, दि. २० : मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा वारसा पुढे नेण्याचे काम पत्रकारांनी करावे. त्यांच्या स्मरणार्थ उभारण्यात येणारे पत्रकार भवन पत्रकारांना प्रेरणा व ऊर्जा देणारे ठरेल. या ज्ञान मंदिराचे पावित्र्य जतन करुन बाळशास्त्री जांभेकरांच्या जनहितकारक पत्रकारितेचा वारसा पुढे न्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवनाचे उद्घाटन तसेच कोनशिला अनावरण करुन बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुतळ्यास केंद्रीय मंत्री श्री. राणे यांनी पुष्पहार अर्पण केला. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दूरदृश्यप्रणालीद्वारे शुभेच्छा दिल्या. यानंतर जिल्हा नियोजन समिती नवीन सभागृहात झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री श्री. राणे यांनी उपस्थितांना संबोधित केले.

पत्रकार भवन मराठी पत्रकारांना प्रेरणा देणारं, ऊर्जा देणारं ठरेल – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दूरदृश्य प्रणालीद्वारे शुभेच्छा देताना म्हणाले की,  आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण मधून मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली. सामाजिक सुधारणांवर भर दिला. त्यांचे स्मारक मराठी पत्रकारांना प्रेरणा, ऊर्जा देणारं ठरेल. ज्ञान मंदिर बनवून त्याचं पावित्र्यं जतन करावे. जांभेकरांचा वारसा पुढे नेण्याचे काम पत्रकारांना करायचे आहे. हे स्मारक त्यासाठी प्रेरणा आणि स्फूर्ती देणारे ठरेल. भविष्यातही शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

पत्रकारांसाठी हक्काचे व्यासपीठ – केंद्रिय मंत्री नारायण राणे

केंद्रीय मंत्री श्री. राणे म्हणाले की, आज राज्यभरातील पत्रकारांसाठी एक हक्काचे दालन सज्ज झाले आहे. या स्मारक व भवन उभारण्यामागे सर्व पत्रकारांचे योगदान आहे. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर  यांचे स्मारक प्रेरणदायी ठरेल. पत्रकारितेत त्यांनी सांगितलेले पावित्र्य जोपासावे, समाजाला प्रेरणा देऊन, समाजाचे प्रबोधन करुन समाजाच्या विकासाचे, प्रगतीचे विषय हाताळले जातील, लिहिले जातील, असे काम पत्रकारांनी करावे. आपला जिल्हा देशात समृद्ध जिल्हा म्हणून ओळखला जावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

आपला पेशा पत्रकारितेचा आहे, त्याच पावित्र्य टिकवणे हा आपला धर्म आहे. आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी विधायक, विकासात्मक कार्यकर्तृत्वाची ऊर्जा मराठी पत्रकारितेतून दिली आहे. समाज प्रबोधन होऊन समाजाच्या विकासाचे प्रगतीचे विषय पत्रकार भवनातून हाताळले जावेत, अशी अपेक्षा केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केली.

शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री यांनीही दूरदृश्य प्रणालीद्वारे शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर हे महाराष्ट्राचे भूषण आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पत्रकार भवनाची आवश्यकता होती ती आता साकार झाली आहे. पुढील काळातही पत्रकार भवनाबाबत सर्वतोपरी मदत शासनाच्या माध्यमातून केली जाईल. पत्रकार भवनामध्ये सुसज्ज ग्रंथालय होण्यासाठी मराठी भाषा विभागाच्या माध्यमातून पुस्तके दिले जातील.

आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांनीही शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्यासह विविध प्रसार माध्यमांतील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Exit mobile version