Home महाराष्ट्र जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर कामे जलद गतीने पूर्ण करावीत : मंत्री गुलाबराव...

जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर कामे जलद गतीने पूर्ण करावीत : मंत्री गुलाबराव पाटील

0

नाशिक, दि.26: जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर पाणी पुरवठा योजनांचे आज ई- भूमीपूजन झाले आहे. या मंजूर योजनांची कामे ग्रामपंचायतींनी जलद गतीने पूर्ण करावीत. गतीने व दर्जेदार काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना जलदूत पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

आरोग्य विज्ञान विद्यापीठ येथे आयोजित जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील मंजूर पाणी पुरवठा योजनांच्या ई-भूमीपूजन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार या दुरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होत्या. बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार नितिन पवार, हिरामण खोसकर, जिल्हधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांच्यासह जिल्ह्यातील सरपंच व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

यावेळी मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून आपल्या दारापर्यंत नळाद्वारे पाणी येणार आहे. परंतु पाणी जपून वापरणे ही काळाजी गरज आहे. पाण्याचा अपव्यय टाळून पाणी बचतीचे नियोजन प्रत्येक व्यक्तीने केले पाहिजे. जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील 1320 योजनांचे 2560 कोटी रूपयांच्या कामांचे आज भूमिपूजन झाले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात जलजीवन अतंर्गत कामांच्या व्याप्तीसह व त्यास लागणारा निधीही आपणास उपलब्ध झाला आहे. गावातील सरपंच, ग्राम प्रतिनिधी यांनी लोकसहभागातून व एकोप्याने ही कामे पूर्ण करावयाची आहेत. ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी आरओ प्लॅान्टसची उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठीचे प्रस्ताव ग्रामपंचायतींनी त्वरीत सादर करावेत. बारामती तालुक्याच्या धर्तीवर सुरगाणा, पेठ, कळवण व मालेगांव या ठिकाणी भूमिगत साठवण टँकस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात या टँकस मध्ये पाणी साठवण करून त्याचा उपयोग उन्हाळ्यात करण्यात येईल. विहिरींच्यालगत शोषखड्डे तयार करून त्यात सांडपाणी जमिनीत जिरवले गेले तर निश्चितच विहिरींच्या पाण्याची पातळी वाढणार असल्याची माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिली. जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत जलजीवन मिशन अंतर्गत झालेले कार्य स्तुत्य असल्याचे कौतुकही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी केले.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या की, नाशिक मधून उगम पावणारी गोदावरी आंध्रप्रदेशात येऊन समुद्रात विलीन होते. या नदीच्या मार्गात येणारा सर्व भाग अतिशय सधन असून या पाण्यावर अनेक उद्योग व्यवसाय सुरू आहेत. जलजीवन मिशनच्या माध्यमातून ज्या गावांत कामे केली जात आहेत, त्या प्रत्येक ठिकाणी कामांचे फलक लावणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकार व राज्य शासनाच्या वतीने ग्रामीण भागात जलजीवन मिशन ची कामे केली जात आहेत, त्यांची विभागामार्फत जनजागृती करण्यात यावी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली जल शक्ती मंत्रालय निर्माण करण्यात आले असून त्या मंत्रालयाच्या वतीने राज्यामार्फत पाठविण्यात आलेले सर्व प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यामुळे ग्रामीण भागात पाणी पोहचत आहे, असे ही केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांनी सांगितले. गोदावरी नदीमध्ये प्रदूषणामुळे पाणवेलींचे प्रमाण वाढत आहे. या पाणवेली काढण्यासाठी प्रशासन स्तरावरून नियोजन करण्यात यावे, अशा सूचनाही यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी यावेळी दिल्या.

पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले की, पाणी हा महिलांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. जलजीवन योजनांच्या माध्यमातून महिला भगिनींच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा खाली उतरणे हे अत्यंत पवित्र काम होणार आहे. भविष्याच्या दृष्टीने पाण्याचे उत्तम स्त्रोत गावात तयार झाले पाहिजेत. गावातील ज्येष्ठ मंडळींचे मार्गदर्शन व सहभाग या कामांमध्ये वाढल्यास पाण्यांच्या स्त्रोताची स्थळे निश्चित करण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यात काही भागात पाऊस जास्त पडतो. परंतु साठवणीसाठी पर्यायी स्त्रोत नसल्यामुळे अशा भागात टँकर्सची आवश्यता भासते. अशा ठिकाणी पाणी जमिनीतील टाक्यांमध्ये साठवण करून, त्याचप्रमाणे साठवण तलाव व शेततळे तयार केल्यास याचा उपयोग निश्चितच टंचाईच्या काळात होऊ शकेल. जिल्ह्यात सौर प्रकल्प उभारणी करून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या पथदिपांचे वीजबील एकाच ठिकाणी रूपांतरीत करता येईल, असा प्रकल्प जिल्हा नियोजनच्या माध्यमातून प्रस्तावित असल्याची माहिती यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी दिली

यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. म्हणाले की, केंद्र व राज्य शासनामार्फत जलजीवन मिशन अंतर्गत 2024 पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पाणी पोहोचविण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. शासनाचे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तसेच आपल्या गावात पाण्याची सुविधा निर्माण होण्यासाठी सर्वांसाठी जलजीवन मिशन अंतर्गत ही एक सुवर्णसंधी प्राप्त झाली. त्यामुळे या संधीचा गावपातळीवर लाभ घेण्यासाठी गावकऱ्यांसोबतच तेथील लोकप्रतिनिधींनी देखील यात सहभागी होणे आवश्यक आहे. त्यासाठी ग्रामसभेच्या माध्यमातून या योजनेची माहिती सर्वांना करून देऊन गुणवत्तापूर्ण काम करून घेण्याची जबाबदारी सर्वांनी मिळून पार पाडणे गरजेचे आहे. तसेच कंत्राटदारांनी स्थानिक पातळीवरील मजुरांना काम देण्यात यावी, जेणे करून अधिक चांगल्या प्रकारे व वेळेत कामे पूर्ण होण्यास मदत होईल. या योजनेची अंमलबजावणी करतांना पाण्याच्या स्त्रोतांची नीट पाहणी करण्यात यावी. या योजनेच्या अंमलबजावणी सोबतच गावातील सांडपाणी शोषखड्ड्यांच्या साहाय्याने जमिनीत मुरेल व नाल्यामार्फत नदीमध्ये मिसळणाऱ्या सांडपाण्यामुळे होणारे नदी प्रदूषण देखील थांबेल. त्यामुळे गावातील सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी शोष खड्ड्यांचा वापर देखील करण्यात यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी यावेळी केले.

दृष्टीक्षेपात

 जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे जलजीवन मिशन अंतर्गत एकूण 15

तालुक्यांत 1282 योजना असून यात एकूण समाविष्ट गावे 1356 असून मंजूर

कामांची एकूण किंमत रूपये 1443.05 कोटी इतकी आहे.

 महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ नाशिक जलजीवन मिशन अंतर्गत 24 योजना

मंजूर आहे. यात एकूण 302 गावे समाविष्ट असून मंजूर योजनांची एकूण किंमत

रूपये 94326.47 लक्ष इतकी आहे.

 महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलव्यवस्थापन विभाग नाशिक अंतर्गत 14 योजना मंजूर

आहेत.यात एकूण 106 गावे समाविष्ट असून योजनांच्या एकूण कामांची किमंत

रूपये 17408.47 लक्ष इतकी आहे.

Exit mobile version