Home महाराष्ट्र तीर्थक्षेत्र आणि प्राचीन वास्तूंचा विचार करून विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना

तीर्थक्षेत्र आणि प्राचीन वास्तूंचा विचार करून विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना

0

मुंबई, ता. 17 : पंढरपूर, जि. सोलापूर येथील विकास आराखडा तयार करताना तीर्थक्षेत्र आणि प्राचीन वास्तूंचा विचार करूनच सर्वसमावेशक, सर्व सोयासुविधांयुक्त विकास आराखडा तयार करावा, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि उपस्थित मंत्री महोदयांनी दिल्या.

आमदार मनीषा कायंदे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीच्या पार्श्वभूमीवर उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या दालनात आज दुपारी पंढरपूर कॉरिडॉर संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महसूल मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पर्यटन मंत्री उदय सामंत, सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, आमदार सर्वश्री महादेव जानकर, रणजितसिंह मोहिते- पाटील, सचिन अहिर, अमोल मिटकरी, समाधान औताडे, आमदार मनीषा कायंदे, सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, पोलिस अधीक्षक शिरीष देशपांडे, मंदिर समितीच्या माधवी निगडे, पुरातत्व खात्याचे संचालक तेजस गर्गे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सुनील गावडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अरविंद माळी, नगरविकास विभागाच्या सहसचिव प्रतिभा भदाणे, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, मंदिर सल्लागार समितीच्या तेजस्विनी आफळे, सामाजिक कार्यकर्ते संभाजीराजे शिंदे आदी उपस्थित होते.

उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले, की पंढरपूर कॉरिडॉर संदर्भात तांत्रिक मार्गदर्शन करणारे सल्लागार आणि प्रशासनाने समन्वयाने काम करावे. वारकऱ्यांनी तयार केलेल्या प्रारूप आराखड्यातील सकारात्मक बाबींचा या आराखड्यात समावेश करावा. याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री यांच्यास्तरावर होईल. मात्र, या बैठकीत होणाऱ्या चर्चेअंती मिळणाऱ्या सूचनांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले आहे. वाराणसीमध्ये झालेल्या पुनर्वसन प्रकल्पाची माहिती प्रशासनाने घेत स्थानिक नागरिकांच्या सूचना ऐकून घ्याव्यात. त्यावरील संभाव्य उपाययोजनांची माहिती वारकऱ्यांना द्यावी.

डॉ. सावंत यांनी सांगितले की, पंढरपूर हे जागतिक पातळीवरील तीर्थक्षेत्र आहे. तेथे रोज हजारो भाविकांची वर्दळ असते. त्यानुसार भाविकांना आवश्यक सुविधा देण्यासाठी हा कॉरिडॉर शासनातर्फे आहे. पर्यटन मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले की, वाराणसीच्या धर्तीवर पंढरपूर कॉरिडॉर विकास करताना स्थानिकांच्या भावना लक्षात घेवून पंढरपूर विकासाचे वेगळे मॉडेल तयार करण्यात येईल. त्यासाठी सर्वांना विश्वासात घेण्यात येईल. महसूल मंत्री श्री. विखे पाटील यांनी शासन स्तरावरून सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

आमदार श्री. औताडे, श्री. जानकर, श्री. अहिर, श्रीमती कायंदे यांनी विविध सूचना केल्या. जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांनी या आराखड्याबाबत नागरिकांच्या असलेल्या हरकती आणि त्यावरील संभाव्य उपाययोजनांबाबत माहिती दिली.

Exit mobile version