महिला सक्षमीकरणासाठी त्यांचे हक्क, प्रतिनिधीत्व, विकासाची संसाधने उपलब्ध होणे गरजेचे – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

0
5

मुंबई, दि. 29 :- महिला सक्षमीकरणाची संकल्पना व्यापकप्रमाणात कृतीशील होण्यासाठी महिलांचे हक्क, त्यांचे प्रतिनिधीत्व आणि प्रगतीसाठीची संसाधने त्यांना सहजतेने उपलब्ध होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज येथे केले.

मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे टीसर संस्थेच्या वतीने आयोजित “डिजिटल इनोव्हेशन ॲन्ड टेक्नॉलॉजी फॉर जेंडर इक्वालिटी” या विषयावरील चर्चासत्रात त्या बोलत होत्या. फ्रान्स, जर्मनी, स्पेन आणि कॅनडा या देशांनी एकत्रितपणे करीत असलेल्या महिलांविषयक कामाचा प्रारंभ या कार्यक्रमाच्या निमित्ताने झाला.

यावेळी डॉ.गोऱ्हे म्हणाल्या की, आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल माध्यमातून महिलांना त्यांच्या क्षमता सिद्ध करणे शक्य होणार असले तरी त्यासाठी आवश्यक असणारी साधने स्मार्टफोन, लॅपटॉप, इतर पूरक आधुनिक साधने, तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण या बाबी सहजतेने मिळत नाही. त्यादृष्टीने महिलांना व्यापक संधी देण्याची मानसिकता समाजात वाढीस लागणे आवश्यक आहे. एक दशलक्षहून अधिक महिला निर्णय प्रक्रियेत आहेत, ते लक्षात घेता महिलांच्या हक्क, प्रतिनिधित्व आणि विकासाच्या संसाधनाच्या उपलब्धतेसाठी आणखी भरीव प्रयत्न करणे आवश्यक आहे.

डॉ.गोऱ्हे म्हणाल्या की, ‘महाराष्ट्र राज्यात महिला आर्थिक विकासासाठी अनेक योजना यशस्वीरित्या राबविल्या गेलेल्या आहेत. त्यासोबतच माविम, उमेद, स्त्री आधार केंद्र या सारख्या शासकीय आणि स्वयंसेवी संस्थाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक सबलीकरणाला केंद्रीभूत ठेऊन उपक्रम राबवले जात आहेत. त्याचप्रमाणे लवकरच राज्य शासनाचे चौथे महिला धोरण जाहीर होणार आहे. मात्र  स्त्रीवादी परराष्ट्र धोरण सोपे होण्यासाठी त्या मार्गावर फारशी प्रगती झाली आहे, असे वाटत नाही.’

परिसंवाद कार्यक्रमाच्या समारोपात श्रीमती गोऱ्हे म्हणाल्या की, “शाश्वत विकास आणि हवामान बदल या दोन महत्त्वाच्या विषयांवरही जागतिक स्तरावर व्यापक काम करण्याची गरज असून या दोन्ही क्षेत्रात परस्पर सहकार्याने विविध उपक्रम राबविता येतील, त्याचप्रमाणे जगभरातील विविध यशकथांची देवाण-घेवाण या माध्यमातून केल्यास ती एकमेकांना निश्चितच दिशादर्शक ठरेल.”

यावेळी सर्व मान्यवरांना हस्तकला कारागीरांनी बांबूपासून तयार केलेल्या भारतीय ध्वजाच्या विशेष प्रतिमा भेट देण्यात आल्या.

यावेळी व्यासपीठावर टिसर संस्थेच्या डॉ.मेधा फणसळकर, डॉ.अनिता तोष्णीवाल, रंग दे संस्थेचे रामकृष्ण एन. के., प्रत्युष पांडा, मेक्सिकोचे कौन्सुलेट जनरल अडॉल्फ ग्रेसिया एत्राडा, हेमंत गुप्ता, हनीशा वासवाणी, डॉ.अमीना चरणीया यांच्यासह इतर अनेक संस्थाचे मान्यवर, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील हस्तकला कारागीर आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.मेधा फणसळकर यांनी केले. सी.जी.सेरे चार्लेट यांनी आभार व्यक्त केले.