Home महाराष्ट्र बहुजन समाजातील मुलांना पुजारी म्हणून नियुक्त करा; मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकरांची...

बहुजन समाजातील मुलांना पुजारी म्हणून नियुक्त करा; मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकरांची मागणी

0

बुलढाणा- मंदिरे ब्राह्मणमुक्त करा. बहुजन समाजातील मुला-मुलींची पुजारी म्हणून नियुक्ती करा, अशी मागणी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी केली आहे. नाशिकच्या काळाराम मंदिरात छत्रपती शाहू महाराजांच्या वंशज असलेल्या संयोगिताराजे भोसले यांच्यासोबत घडलेला प्रकार निषेधार्ह असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली. ते बुलढाण्यात बोलत होते.

राज्यातील सर्व मंदिरांमधून ब्राह्मण पुजारी हटवा. सर्व मंदिर भटमुक्त करून मंदिरांचे राष्ट्रीयीकरण करा, यासाठी पुढील काळात राज्यभरात आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तर देवस्थांनांचा पैसा गरीब मुला-मुलींच्या शिक्षणासाठी वापरावा, असेही त्यांनी म्हटले आहे.

नेमके प्रकरण काय?

नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगीताराजे छत्रपती यांना वैदिक मंत्र म्हणण्यास विरोध करण्यात आला. त्याकाळी शाहू महाराजांनी धार्मिक क्रिया पुराणोक्त विधीनुसार न करता वैदिक विधिनुसार करण्याचा आदेश काढला होता. या पार्श्वभूमीवर संयोगीताराजे यांचा संताप अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.

खदखद केली व्यक्त

संयोगीताराजे छत्रपती यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट करत आपल्या मनातील खदखद व्यक्त करत एकूणच घटनेवर टीका केली आहे. रामनवमीच्या निमित्ताने संयोगीताराजे यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरास भेट दिली. यावेळी पूजा करताना महंतांनी ही पूजा पुराणोक्त पद्धतीने करण्यास सुरुवात केली. यास संयोगिताराजे छत्रपती यांनी विरोध दर्शवत वैदिक पद्धतीने मंत्र म्हणण्यास सांगितले. तसेच ज्या मंदिरांमध्ये तुम्ही आजच्या काळातही हे नियम लावत आहात, ती मंदिरे वाचविली कोणी? छत्रपतींनी वाचविली! मग छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका, अशाप्रकारे पोस्ट करत महंतांना खडसावले आहे.

वेदोक्त प्रकरण काय?

शाहू महाराज राजघराण्यातील धार्मिक परंपरेने कार्तिक महिन्यात पंचगंगा नदीकाठी स्नानासाठी महिनाभर नियमितपणे जात असत. महाराजांनी अंघोळ सुरू केल्यानंतर त्यांच्याबरोबर असलेला नारायण नावाचा पुरोहित काही मंत्र म्हणत असे. मात्र, हा भटजी स्वतः अंघोळ न करताच मंत्र म्हणत होता. मंत्र म्हणताना पायातल्या चपला सुद्धा काढत नव्हता. पुरोहित जो मंत्र म्हणत होता तो काही वेदोक्त नव्हता, तर पुराणोक्त होता.

संतापाचा भडका उडाला

शाहू महाराजांनी त्याला विचारले की, तुम्ही वेदोक्त मंत्र म्हणत नाही? त्यावर तो म्हणाला शुद्रांसाठी पुराणोक्तच सांगावे लागते. शिवछत्रपतींच्या वंशजाला शुद्र म्हणून एक सामान्य भटजी संबोधत असल्याने महाराजांच्या मस्तकात आग पेटली. महाराजांनी त्या नारायण भटजीची तातडीने हाकालपट्टी करत राजवाड्यातील राजपुरोहितांना सुद्धा सर्व धार्मिक विधी वेदोक्त मंत्रांनी करावीत असे सुनावले. यानंतर हे वेदोक्त प्रकरण प्रकरण फक्त करवीर संस्थानापुरते मर्यादित न राहता महाराष्ट्रभर पोहोचले.

error: Content is protected !!
Exit mobile version