पावसाळ्यापूर्वीची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
12

ठाणे, दि. 23 :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील नालेसफाई आणि रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई, रस्त्यांची कामे ही दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

कॉनवूड जंक्शन येथील चौक सुशोभीकरण व रस्त्याचे काम, पवार नगरमधील रस्त्यांची कामे, टिकुजीनी वाडी ते नीलकंठ रस्ता, घोडबंदर रोडवरील आनंद नगर येथील नाला, कोरम मॉल मागील नाला आणि ज्ञानसाधना महाविद्यालय येथील परबवाडीजवळील नाल्याची पाहणी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केली. आमदार प्रताप सरनाईक, माजी महापौर नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त तथा प्रशासक अभिजित बांगर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

कॉनवूड जंक्शन येथील रस्त्याच्या कामापासून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पाहणी दौरा सुरू केला. येथील काम रेंगाळल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त करून काम का रेंगाळले याचा संबंधितांकडून खुलासा घ्यावा व खुलासा असमाधानकारक असल्यास कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. तसेच ठाणे शहरातील रस्त्यांच्या कामांची पाहणी करत असताना टिकूजीनी वाडी सर्कल येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या डांबरीकरण कामाची मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पाहणी केली. यावेळी तेथील कंत्राटदाराने कामगारांना कोणतीही सुरक्षा साधने, हॅन्ड ग्लोव्हज, हॅल्मेट इत्यादी दिली नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी याची तातडीने दखल घेऊन कंत्राटदारावर कारवाई करण्याचे निर्देश दिले. रस्त्यांची कामे होणे हे जितके महत्त्वाचे आहे, तेवढेच ते बनवणारे कामगार सुरक्षित राहणे महत्वाचे असल्याचे सांगून त्यांनी या कंत्राटदाराला तत्काळ ही सामुग्री देण्याबाबत सांगितले. तसेच त्यांच्यावर याबाबत कारवाई करण्याचे निर्देशही पालिका आयुक्तांना दिले.

यावेळी घोडबंदर रोडवरील आनंद नगर येथील स्वामी समर्थ मठात भेट देऊन दर्शन घेतले. ठाणे महापालिकेच्या परिवहन विभागाच्या इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण कोरम मॉल येथे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले.

सफाई कामगाराशी साधला संवाद

ठाण्यातील नालेसफाई पाहणी दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पवार नगर येथील सायकल ट्रॅकची सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्याबरोबर संवाद साधून कामाची माहिती घेतली. तसेच येथील रस्त्याच्या कामाची पाहणीही मुख्यमंत्र्यांनी केली.

… तर एक लाखांचा दंड

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की,  पावसाळ्यापूर्वीची कामे पाहण्यासाठी हा दौरा केला आहे. महापालिका क्षेत्रात जवळपास 134 किमीच्या रस्त्यांची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. या सर्व रस्त्यांची कामे चांगल्या दर्जाची झाली पाहिजेत. रस्त्यांच्या कामांचा दर्जा तपासण्यासाठी आयआयटीला त्रयस्थ संस्था म्हणून परिक्षण करण्याचे काम दिले आहे. रस्त्यांच्या कामांचे नमुने त्यांच्याकडे पाठविण्यात येतील. नवीन रस्त्यांमध्ये खड्डे पडले तर एका खड्ड्याला एक लाख रुपये दंड अशी टेंडरमध्ये अट टाकण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्यांच्या कामांचा दर्जा राखला जाईल. ही कामे वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी महापालिका आयुक्त व संबंधित अधिकारी पाठपुरावा करत आहेत.

पावसाळ्यापूर्वीची नालेसफाईची कामे वेळेत पूर्ण व्हायला हवीत. पावसाळ्यात खड्ड्यांचा त्रास लोकांना होऊ नये, यासाठी महापालिकेने नियोजन केले आहे. पावसाळ्यात ज्या ठिकाणी खड्डे पडणार नाहीत, नाले तुंबणार नाहीत, असे चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात येईल. निष्काळजीपणा आढळेल व नागरिकांना त्रास होईल, अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

ठाणे महापालिका क्षेत्रात मास्टिकचे, काँक्रिटीकरणाची, सुशोभिकरणाची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. उद्याने चांगली राहावीत, यासाठीही सूचना दिल्या आहेत. महापालिकेला राज्य शासनाकडून जवळपास 600 कोटी रुपये दिले आहेत. ठाणेकरांना कुठलाही त्रास होऊ नये, याची काळजी घेतली आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

०००००